वीजजोड तोडण्याचे महापाप करणार्‍या सरकारला किंमत मोजावी लागेल : आमदार विखे पाटील वीज वितरण कंपनीच्या कारवायांविरोधात संगमनेरात भाजपाचा एल्गार मोर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा वसुलीचा कार्यक्रम जोरात सुरु आहे. या सरकारला फक्त घ्यायचे माहिती आहे, द्यायचे माहित नाही. मागील दोन वर्षात सरकारने कवडीचीही मदत शेतकर्‍यांना केलेली नाही. दारुचे कर माफ करणारे सरकार शेतकर्‍यांना मात्र मोफत वीज देवू शकत नाही ही शोकांतिका आहे. आज तुम्ही डिप्या बंद केल्या, उद्या तुम्हाला बंद करण्याची वेळ आणू नका. वीज बीलासाठी शेतकर्‍यांना वेठीस धराल तर कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेरात दिला.


तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वीज प्रश्नांच्या संदर्भात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आज एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील तीनबत्ती चौकातून निघालेला हा मोर्चा नाशिक-पुणे महामार्गाने बसस्थानक, नवीन रोड या मार्गाने वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी भाजापाचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले, जेष्ठनेते वसंतराव गुंजाळ, भाजपाचे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष सतिष कानवडे, युवामोर्चाचे अ‍ॅड.श्रीराज डेरे, जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड.रोहिणी निघुते, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, पं.स.सदस्य गुलाबराव सांगळे, जावेद जहारगीरदार, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, सुधाकर गुंजाळ, विक्रम खताळ, राम जाजू, अमोल खताळ, सचिन शिंदे, पप्पू गाडे, राहुल दिघे, वैभव लांडगे, गोकुळ दिघे, शैलेश फटांगरे, डॉ.सोमनाथ कानवडे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी झालेल्या सभेत आमदार विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारचा खरपूस समाचार घेतला. आघाडी सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचा घणाघात करतांना त्यांनी मागील दोन वर्षात राज्य सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केली नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारचा सध्या एकमेव वसूलीचा अजेंडा आहे. त्यांच्या वसुलीचे आकडेसुद्धा 100 कोटीपर्यंत गेले आहेत. वसूली करताकरता सरकारमधील मंत्री जेलमध्येही गेले आहेत. तर अनेकजण ईडीच्या कार्यालयात खेट्या घालीत आहेत. त्यामुळे सरकारने वीज बिल वसुलीचा नवा फंडा सुरु केल्याची टीका त्यांनी केली.


एकीकडे महाविकास आघाडीचे सरकार दारुच्या दुकानांना कर माफ करते. मात्र शेतकर्‍यांना वीजबिलात कोणतीही सवलत दिली जात नसल्याची खंत व्यक्त करुन सरकारनेच शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुकट वीज मागायला कोणी तुमच्याकडे आले नव्हते. आता आश्वासन दिलेच आहे तर त्याची पूर्तताही करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सरकारमधील सर्वच मंत्री आता स्वतःला मुख्यमंत्री समजू लागले आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे त्यांना काहीही देणंघेणं राहिलेलं नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही. आपले अपयश झाकण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवून मोकळे होते. मदत करायची फक्त केंद्र सरकारने. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मात्र बंगल्यात बसून आहेत. त्यांना आता गावात फिरु देवू नका असे आवाहन करुन विखे पाटील म्हणाले की, या सरकारने शेतकर्‍यांची वीज तोडून महापाप केले आहे याची किंमत सरकारला चूकवावी लागेल.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ‘भाजप सरकारच्या काळातच वीजेची थकबाकी वाढल्याचा आरोप केला होता.’ त्याचा समाचार घेतांना आमदार विखे यांनी जोरदार घणाघात करीत ‘तुमच्या अपयशाचे पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजपावर बेताल आरोप करीत आहात, आता तर सरकार तुमचेच आहे; मग तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?’ असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही टिका करतांना ‘थोरात यांना शेतकर्‍यांचे प्रश्‍न समजले आहेत का? यांना वसुलीतून वेळ मिळतोय का?’ असे सवाल उपस्थित करीत कोणतेही सरकार आले तरीही ते शेतकर्‍यांना मदत करतेच, त्यामुळे आता वसुली थांबवा आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावा असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.

यावेळी विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना इशारा देतांना मंत्र्यांच्या दबावाखाली कारभार न करण्याचा सल्ला दिला. आघाडी सरकारचा टांगा पलटी कधी होईल सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या नियमातच काम करा. उगाचच शेतकर्‍यांना डिवचू नका. आम्ही तुम्हाला आठ दिवसांची मुदत देत आहोत. तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून द्या अन्यथा याच कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस वाकचौरे, शहराध्यक्ष गणपुले, शेतकरी आघाडीचे सतिष कानवडे यांचीही भाषणे झाली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वितरण कार्यालयासमोर केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मोर्चात सहभागी झालेल्या भजनी मंडळाने सर्वांच लक्ष वेधून घेतले होते. आमदार विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

Visits: 160 Today: 1 Total: 1112724

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *