कौठेवाडीतील बिरोबाच्या यात्रेत आगीचा थरार शेकडो वर्षांपासूनची प्रथा; भाविकांची मोठी गर्दी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कौठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत आगीचा थरार बघावयास मिळतो. ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर लाल निखार्याची तेवत असलेली मातीची घागर घेऊन भाविकांनी बिरोबाच्या मंदिराला फेरा मारण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा ही अनोखीच असते. अशीच एक प्रथा अक्षय्य तृतीयानंतरच्या येणार्या पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावच्या यात्रेत बघावयास मिळते. कोरोनामुळे यात्रेत दोन वर्षे खंड पडला होता. मात्र, यंदा यात्रा भरल्याने मोठी गर्दी झाली होती. त्याचसोबत कठ्यांची संख्याही 91 होती.
मध्यरात्रीपर्यंत भक्तगण फेर्या मारतात. कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर माठ असतो. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उघडा करून ठेवला जातो. त्यात खैराची पेटणार्या झाडांची लाकड उभी केली जातात. त्यात कापूस टाकत ती बाहेरच्या बाजूने नवीन कोर्या कपड्याने त्याला घट्ट बांधले जाते. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट करुन मंदिरासमोर हे कठे ठेवले जातात. दर्शनसाठी आलेले अनेक भाविक या कठ्यांवर थोडं थोडं तेल टाकत राहतात. त्यानंतर साकीरवाडी गावाला मान असलेली कठी मंदिरात रात्री नऊला पोहचल्यानंतर हे कठे पेटवले जातात. हे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन ‘हुई हुई’चा आवाज करत भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेर्या मारतात. भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार – कठ्यातील निखार्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून, केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पूर्तीसाठी कठा तयार केला जातो. तसेच आगीची घागर डोक्यावर घेणार्या भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार झालेला असतो, अशी धारणा भाविकांची आहे.
जुन्या जाणतांच्या मते हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळी काही लोक कौठेवाडी येथे आले. येताना आपला दगडरुपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना. तेव्हा हा प्रांत जहागिरी खाली होता. तेथील जहागिरदाराने भोईर आणि भांगरे यांनी कसण्यास जमीन देत येथेच स्थायिक होण्यास सांगितले. तेव्हापासून येथे बिरोबाची पूजा करण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.