अखेर ‘त्या’ बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; शहरी आरोग्य अधिकारी मात्र दबावातून रजेवर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
इयत्ता बारावी कलाशाखेच्या अर्हततेवर अनधिकृत संस्थेकडून प्राप्त केलेल्या ‘नॅचरोपॅथी व योगीक सायन्स’ विषयाचे प्रमाणपत्र मिळवून डॉक्टर म्हणून मिरवणार्या आणि रुग्णांवर राजरोसपणे उपचार करणार्या बोगस डॉक्टर जावेद आयुब शेख याच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी दैनिक नायकच्या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी उशिराने याबाबत शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा कचकुरे यांना लेखी आदेश बजावले असून ‘त्या’ मुन्नाभाईवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमातंर्गत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. मात्र दैनिक नायकमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून त्या रजेवर गेल्या असून त्यांच्यावर तालुका वैद्यकिय अधिकार्यांचा दबाव असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या उपरांतही शहर विभागाच्या वैद्यकिय अधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरातील बागवानपुर्यातील नवरंग कॉम्प्लेक्समध्ये एक मुन्नाभाई ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावून ‘हमसफर क्लिनिक’ नावाचे रुग्णांची फसवणूक करणारे केंद्र चालवत असल्याची माहिती तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना समजली होती. त्यावरुन त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्यांनी 10 एप्रिल, 2023 रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा कचकुरे यांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले. त्यांनी 13 एप्रिल रोजी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांसह ‘त्या’ बोगस डॉक्टरच्या ठिकाणावर छापा घालून सखोल तपासणी केली.
या कारवाईत कथित डॉक्टर जावेद आयुब शेख याच्याकडे इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्याने यावेळी इयत्ता बारावीच्या कला शाखेचे गुणपत्रक सादर केले. संबंधित मुन्नाभाई आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावत असल्याने त्याबाबत विचारणा केली असता त्याने अनधिकृत ‘रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन’ या छत्रपती संभाजीनगरमधील एका संस्थेकडून ‘नॅचरोपॅथी व योगीक सायन्स’ हा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र दाखवले. या सर्व गोष्टींवरुन तो बोगस डॉक्टर असल्याचे व केवळ बारावीपर्यंत अधिकृत शिक्षण घेवून तो चक्क रुग्णांवर उपचार करीत असल्याचेही सिद्ध झाले. त्यामुळे तपासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा कचकुरे यांनी 25 एप्रिल रोजी जावेद आयुब शेख याने महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 च्या कलम 33 (1) प्रमाणे आवश्यक प्रमाणपत्रांसह त्याच्या व्यवसायाची नोंद केलेली नसल्याने त्याच्यावर कलम 33 (अ) नुसार कारवाई करण्याची शिफारस पंचायत समितीचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना केली.
बोगस डॉक्टर शोध समितीचे तालुकास्तरीय सचिव या नात्याने त्यांच्याकडून सदरील अहवाल प्राप्त होताच संबंधित बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी या प्रकरणात ‘त्या’ बोगस डॉक्टरला फायद्याचे ठरावे व त्याला पुरावे नष्ट करुन पसार होता यावे यासाठी जाणीवपूर्वक कागदी घोडे नाचवण्यास सुरुवात केली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या आदेशानंतर बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी शहरी वैद्यकिय अधिकार्यांकडून या प्रकरणाची चौकशी करुन त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करुनही तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी चक्क या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार जर्हाड यांच्याशी 3 मे रोजी पत्रव्यवहार करीत त्यांनाच कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
एकंदरीत प्रकारावरुन तालुका वैद्यकिय अधिकार्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी 8 मे, 2023 रोजी बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी पत्रव्यवहार केला. या पत्रातून त्यांनी जावेद आयुब शेख ही व्यक्ती उपरोक्त ठिकाणी क्लिनिक चालवत असल्याने सदरचा विषय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्टखाली येत नसल्याने या प्रकरणात आपण गुन्हा दाखल करु शकत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत तालुका वैद्यकिय अधिकार्यांचे पितळही उघडे पाडले. शासनाच्या परिपत्रकानुसार बोगस डॉक्टर शोध मोहीम समितीचे अध्यक्ष पालिकेचे मुख्याधिकारी आणि तालुकास्तरीय सचिव पंचायत समितीचे वैद्यकिय अधिकारी असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. सदर प्रकरणी त्यांच्याकडूनच कारवाई होणे अभिप्रेत असल्याचा स्पष्ट उल्लेखही त्यांनी या पत्रातून केला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी हे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रथम नियुक्तीकर्ता आणि सनियंत्रण अधिकारी असल्याने त्यांनी शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकार्यांकरवी सदर प्रकरणात कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करणे बंधनकारक असताना त्यांनी ग्रामीण रुग्णालयाशी पत्रव्यवहार केल्याबद्दल तालुका वैद्यकिय अधिकार्यांच्या कामकाजावर त्यांनी ‘कडक’ शब्दात ताशेरे ओढण्यासह संशयही व्यक्त केला. या कालावधीत सदरचा बोगस डॉक्टर फरार होण्याची शक्यता असल्याने अध्यक्ष या नात्याने मुख्याधिकार्यांनी कारवाईचे आदेश द्यावेत अशी सूचनाही करण्यात आली.
जावेद आयुब शेख हा कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय परिषदेचा सदस्य नसल्याने तो बोगस डॉक्टर या संज्ञेस पात्र आहे. त्याने सक्षम अधिकार्यासमोर सादर केलेली निसर्गोपचाराबाबतची प्रमाणपत्रे कायदेशीर नाहीत. महाराष्ट्रात निसर्गोपचाराला उपचार पद्धती म्हणून मान्यता नाही. त्यामुळे जावेद आयुब शेख हा बोगस वैद्यकिय व्यवसायी म्हणून स्पष्ट होत असल्याने त्याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकिय व्यावसायी अधिनियम 1961 अंतर्गत कलम 33 (1) (2), कलम 36 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची सूचनाही ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार जर्हाड यांनी आपल्या 8 मे रोजीच्या पत्रातून मुख्याधिकार्यांना केली होती.
विशेष म्हणजे त्यांनी शोध समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात या प्रकरणातील कायदेशीर कागदपत्रे व इतर बाबींबाबत तालुका आरोग्य अधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे तालुकास्तरीय सचिव डॉ. सुरेश घोलप यांना सर्व माहिती असताना त्यांनी उपलब्ध पुरावे व कागदपत्रांवरुन कारवाई करणे अथवा त्यासाठी आदेश देणे अभिप्रेत असतानाही विनाकारण कागदी घोडे नाचवून वेळेचा अपव्यय करीत आरोपीला पुरावे नष्ट करण्याची व पळून जाण्याची संधी दिल्याचा गंभीर आरोपही केला होता. त्यावरुन संगमनेर तालुक्यातील वाढत्या बोगस डॉक्टरांच्या संख्येला तालुका आरोग्य अधिकार्यांचे पाठबळ असल्याचे व या प्रकरणासह यापूर्वीच्या अशा प्रकरणांत त्यांची भूमिका नेहमीच संशयास्पद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
याबाबत गेल्या शनिवारी (ता.13) दैनिक नायकने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित मुन्नाभाईवर कारवाई होवू नये यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रतिभा कचकुरे यांच्यावर दबाव आणला, त्यामुळे त्या दैनिक नायकमधील वृत्तानंतर लागलीच रजेवर गेल्या त्या आजवर हजर झालेल्या नाहीत. याबाबत मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी चौकशी केली असता त्या दोन दिवसांच्या खासगी कामासाठी रजेवर असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनीही आठवडाभर त्यांची प्रतीक्षा करीत ‘अखेर’ शुक्रवारी (ता.19) त्यांना कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत.
या आदेशात त्यांनी जावेद आयुब शेख (हमसफर क्लिनिक, बागवानपुरा) याच्या चौकशीतून व त्याने नगरपरिषदेस सादर केलेल्या कागदपत्रातून ‘तो’ बोगस डॉक्टर या श्रेणीत असल्याचे सिद्ध होत असून कारवाईस पात्र असल्याचे म्हंटले आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमाच्या प्रचलित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करावा असेही या आदेशातून सांगण्यात आले आहे. या उपरांतही डॉ. प्रतिभा कचकुरे यांनी संबंधित मुन्नाभाईवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीच्या अध्यक्षांकडे तक्रार केली जाणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सामाजिक व राजकीय दबाव झुगारुन उजेडात आणल्याबद्दल जिल्ह्यातून दैनिक नायकचे कौतुकही केले जात आहे.
पंचायत समितीचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांचा संगमनेरातील कार्यकाळ पूर्ण होवूनही ते येथेच स्थिरावले आहेत. त्यांची तालुक्यातील संपूर्ण कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आणि संशयात्मक राहिली आहे. कोविड संक्रमणाच्या काळात लोकसेवक असलेल्या या महाशयांनी संसर्गाशी झुंजणार्या नागरिकांना दिलासा देण्याचे सोडून चक्क आपल्या पत्नीच्या नावाने खासगी विलगीकरण केंद्र सुरु केले. याशिवाय कओवइडसआठई झालेल्या हंगामी नोकर भरतीत आपल्या सुपुत्राचे नाव घुसवून प्रत्यक्ष कामावर न जाताही त्याचा मासिक पगार आणि अन्य बिलांच्या माध्यमातूनही त्यांनी मोठी अफरातफर केल्याच्या गोष्टी आता हळूहळू समोर येत असून सामाजिक बांधिलकी म्हणून लवकरच त्यावरील पडदा हटविला जाणार आहे.