राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी ओहोळ विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी केला सत्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप उर्फ बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या सभागृहात ही बिनविरोध निवड झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष पी. आर. पाटील, सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ यांसह राज्यातील सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी मागील महिन्यात कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांची निवड झाली होती. संगमनेरचा सहकार हा संपूर्ण देशाला आदर्शवत असून हीच आदर्श कामकाजाची परंपरा बाबासाहेब ओहोळ यांनीही जपली आहे. त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळले होते. आता कारखान्याचे अध्यक्षपद आणि राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्षपद अशी दुहेरी जबाबदारी त्यांना मिळाली असल्याने संगमनेरच्या सहकार पंढरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या निवडीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधव कानवडे, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, इंद्रजीत थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, संपत डोंगरे, शंकर खेमनर, सुधाकर जोशी, लक्ष्मण कुटे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदिंसह तालुक्यातील विविध पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.