श्रीरामपूर तालुक्यात तहसीलदारांसह पथकाची वाळू साठ्यावर छापेमारी अठरा ब्रास वाळू जप्त; दंडाची करणार आकारणी, वाळूतस्करांत उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील प्रवरा नदी पात्रात पाणी आलेले असले तरी काही वाळूतस्कर चप्पूच्या सहाय्याने नदीतून वाळू काढून साठवत आहे. या साठ्यावर तहसीलदार व त्यांच्या पथकाने धडकेबाज कारवाई करत कडीत व मांडवे येथे जमा केलेली 18 ब्रास वाळू जप्त केली आहे. या कारवाईने वाळूतस्करांत एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये महसूल विभागास कारवाईचे आदेश देण्यात आले होते. सदरचे वाळूतस्कर थर्माकॉलच्या कागदाची होडी व पूल तयार करुन वाहत्या पाण्यातून वाळू काढण्याचा सपाटा चालला असल्याची माहिती त्यांना कळाली. त्यानुसार श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांच्या सहकारी पथकाने प्रवरा नदी पट्ट्यात कारवाईचे सत्र सुरु केले. त्यानुसार यात कडीत, मांडवे, उक्कलगाव या परिसरात प्रवरा नदीच्या किनार्यावर जावून तेथे जिथे वाळू दिसेल तिथे छापा टाकला. तहसीलदार पाटील यांच्या पथकाने सुरुवातीला एक डंपर पकडला. त्यानंतर कडीत येथून 4 साठे, मांडवे येथून 3 असे 7 तर उक्कलगाव येथून काही साठे असे 11 साठे मिळून 18 ब्रास वाळू जप्त केली.
तहसीलदारांनी टाकलेल्या या छाप्यामुळे वाळूतस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून त्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. आता जप्त केलेल्या वाळूवर दंडाची आकारणी करुन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली आहे.