नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची संगमनेरातील कसायांवर कारवाई! मुख्य कसाई गाडी सोडून पळाला; दोन लाखांच्या गोवंश मांसासह साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत शेकडो छापे, कारवाया, जप्त्या आणि अटकसत्र राबवूनही संगमनेरातील गोवंशाच्या रक्ताचे पाट थांबवण्यात स्थानिक पोलीस सातत्याने अपयशीच ठरले आहेत. हे सिद्ध करणारी आणखी एक कारवाई आता समोर आली असून थेट अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकासह आज पहाटे जोर्वेनाका परिसरात केलेल्या कारवाईत तब्बल एक टन गोवंशाच्या मांसासह एक अलिशान वाहन आणि मालवाहतूक टेम्पो असा साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून कत्तलखान्याचा चालक मात्र गोवंशाचे मांस भरलेले वाहन सोडून पसार झाला आहे. या कारवाईने संगमनेरातील गोवंश कत्तलखाने सुरुच असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक पोलिसांनी ते बंद असल्याचा केवळ आभास निर्माण केल्याचेही समोर आले आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस नाईक सचिन आडबल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता.05) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील महामार्गांवरील अवैध हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी गस्त घालीत असताना मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना खबर्याकडून माहिती प्राप्त झाली. त्यानुसार रहेमतनगर परिसरातील गल्ली क्रमांक चारमध्ये कसाई नामे बुंदी उर्फ मुद्दत्सर करीम कुरेशी याने अनेक गोवंश जनावरांची बेकायदा कत्तल केली असून दोन वाहनांमधून त्यांचे मांस वाहून नेण्याची तयारी सुरु असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ आपल्या शाखेच्या गस्ती पथकाला रहेमतनगर परिसरात जावून कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदरची माहिती मिळताच गस्ती पथकातील पोलीस नाईक सचिन आडबल यांच्यासह शंकर चौधरी, संतोष लोंढे यांनी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व अमृत आढाव यांच्याशी संपर्क साधून त्यांना कारवाईकामी सोबत येण्यास सांगितले. त्यानुसार या दोन्ही पथकांनी आज पहाटेच्या सुमारास जोर्वेनाका परिसरात सापळा लावून मिळालेल्या वर्णनाच्या वाहनांचा शोध केला असता पहाटे एक वाजण्याच्या सुमारास जोर्वेकडून संगमनेरच्या दिशेने दोन वाहने येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. सदरील वाहने पोलिसांनी नाकाबंदी केलेल्या ठिकाणावर पोहोचताच पोलिसांनी हातातील विजेर्या दाखवून त्यांना थांबण्याचा इशारा केला.

त्यानुसार आघाडीवर असलेले महिंद्रा झायलो (क्र.एम.एच.44/एच.0834) व त्या पाठीमागील टाटा कंपनीचा (छोटा हत्ती) टेम्पो (क्र.एम.एच.43/ए.डी.2262) ही दोन्ही वाहने थांबली. आपले वाहन पोलिसांनी रोखले आहे हे लक्षात येताच पाठीमागून येत असलेल्या छोट्या हत्तीच्या चालकाने रस्त्यातच वाहन उभे करुन अंधाराचा फायदा घेत तेथून धूम ठोकली, तर आघाडीवर असलेल्या झायलो या अलिशान वाहनाच्या चालकाला मात्र पोलिसांनी जागेवरच जेरबंद केले. यावेळी वाहनाच्या चालकाला त्याची ओळख विचारली असता त्याने आपले नाव सलमान नजीर शेख (वय 20, रा.नायकवाडपुरा) असल्याचे सांगत गाडी सोडून पळालेल्या इसमाची ओळख बुंदी उर्फ मुद्दत्सर करीम कुरेशी (रा.भारतनगर) अशी असल्याचे पोलिसांना सांगितले.

यावेळी पोलिसांनी झायलो वाहनाची तपासणी केली असता त्यात पाठीमागील बाजूस सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे चारशे किलो तर त्या पाठीमागील छोटा हत्ती वाहनात सुमारे 1 लाख 20 हजार रुपये मूल्याचे सहाशे किलो असे एकूण दोन लाख रुपयांचे एक हजार किलो गोवंशाचे मांस भरल्याचे पोलिसांना आढळले. मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई फत्ते झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली साडेतीन लाख रुपये मूल्याची महिंद्रा झायलो व तीन लाख रुपये किंमतीचा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार सदरचे गोवंशाचे मांस घटनास्थळावरुन पसार झालेल्या मुद्दत्सर कुरेशी याच्या मालकीचे असल्याची माहिती दिली. याप्रकरणी पो. ना. आडबल यांच्या फिर्यादीवरुन वरील दोन्ही इसमांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 269, 34 सह महाराष्ट्र प्राणीसंरक्षण कायद्याचे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी सलमान शेख याला गजाआड केले आहे. त्याला आज दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाईने संगमनेर शहरातील कत्तलखाने केवळ आभासी पद्धतीने बंद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून थेट गुन्हे शाखेच्या पथकाच्या छापा घातल्याने कसायांमध्ये खळबळ माजली आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून पोलिसांनी येथील भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड, रहेमतनगर, मोगलपूरा या परिसरातील कत्तलखान्यांवर आजवर शेकडो वेळा छापे घातले. गेल्या आठ वर्षांतील या कारवायांमध्ये शहर पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळणार्या अर्धा डझनहून अधिक पोलीस निरीक्षकांचा यात समावेश होता. मात्र आत्तापर्यंत एकाही पोलीस अधिकार्याला संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांचे समूळ उच्चाटण करण्यात सपशेल अपयशच आल्याचे आजच्या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गेल्यावर्षी भारतनगरमधील कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाली होती. तेव्हापासून येथील सर्व कत्तलखाने बंद असल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी वारंवार केला आहे, मात्र प्रत्येकवेळी तो फोलच ठरला आहे हे विशेष.

