चहाचा आस्वाद घेत मंत्री शंकरराव गडाखांनी साधला जनतेशी संवाद
चहाचा आस्वाद घेत मंत्री शंकरराव गडाखांनी साधला जनतेशी संवाद
समस्यांबाबत केल्या संबंधितांना सूचना; तर साधेपणाचे नागरिकांतून कौतुक
नायक वृत्तसेवा, नेवासा
आमदार असताना व आता नामदार झाल्यानंतरही शंकरराव गडाख यांनी आपली साधी राहणी आणि विचारसरणी कधी सोडली नाही. त्याचा प्रत्यय नेवासा येथे नुकताच आला. चक्क चहाच्या ठेल्यासमोरच बसूनच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेल्यासमोर बसूनच चहाचा आस्वादही घेतला.

सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक हीच माझी ताकद समजून कार्य करणार्या मंत्री गडाख यांनी कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्रभर प्रश्न सोडविण्यासाठी फिरत असताना रविवारी (ता.4) नेवासा शहरात भेट देत सर्वसामान्य नागरिकांशी सुसंवाद साधला. शहरातील त्यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देत उपस्थित कार्यकर्त्यांशी हितगुज करत आरोग्याची विचारपूस केली. त्यांनतर त्यांनी नगरपंचायत चौकाजवळ असलेल्या चांदणे चहा टपरी चालकास भेट दिली. अचानक आपल्या हॉटेलला मंत्री महोदयांचे पाय लागले हे पाहून त्या व्यावसायिकाचा आनंदही गगनात मावेना झाला. त्याने दिलेल्या चहाचा आस्वाद घेत मंत्री गडाख यांनी उपस्थित नागरिकांशी हितगुज केले. शेतीविषयक इतर विविध प्रश्न जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने तात्काळ सूचना केल्या.

उद्योग, व्यवसायावर उपजीविका करणार्या व्यावसायिकांना भेटणे, त्यांच्याशी सुसंवाद साधून काय लागते काय नाही याबाबत गडाख हे तत्पर असतात. त्यांच्या कृतिशील कामामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांना देखील दिलासा मिळून हत्तीचे बळ प्राप्त होत असते अशी भावना एका व्यावसायिकाने बोलून दाखवली. दरम्यान, शंकरराव गडाख हे आज आमदार होऊन नामदार झाले. मात्र त्यांच्यातील साधेपणा अजूनही तसाच असल्याचा अनुभव देखील यावेळी उपस्थित नागरिकांना आला. कोरोनाच्या महामारीत शासन अनेक समस्याना तोंड देत आहे. गडाख हे देखील नेवासा तालुका सांभाळून मंत्री नात्याने महाराष्ट्रभर फिरून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्री नात्याने मोठी जबाबदारी असताना देखील ते नेवासा तालुक्यातील जनतेशी संपर्कात राहून समस्या व प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तालुक्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांचे चिरंजीव युवानेते उदयन गडाख देखील पायाला भिंगरी बांधून तालुक्यात लक्ष घालत आहे. ज्येष्ठ नेते व विचारवंत साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी विचारांची जी शिदोरी दिली तीच घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्री गडाख, प्रशांत गडाख, सुनील गडाख, सुनीता गडाख, जयश्री गडाख, उदयन गडाख हे कृतिशील कार्यक्रमांद्वारे दखल घेत काम करत असल्याने त्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

