पुणतांबा रेल्वे स्थानकावरील स्टोअर रूम आगीत खाक आग ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच आटोक्यात रेल्वे प्रशासनाला यश

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा रेल्वेस्थानकावरील स्टोअर रूमला आग लागल्याने आयओडब्ल्यूचे जुने लाकडी सामान जळून खाक झाले. मात्र, रेल्वे प्रशासनाने पुणतांबा सेक्शनवर ब्लॉक घेतला होता. या कामामुळे लखनौ-पुणे ही एक्सप्रेस थांबलेली होती जर आगीची तीव्रता वाढली असती तर दुर्दैवी घटना घडली असती, पण सुदैवाने काही घडले नाही आणि आग वेळीच आटोक्यात आली.

पुणतांबा रेल्वेस्थानकावरील काही बांधकाम हे ब्रिटीशकालीन आहे. काही नवीन बांधकाम झालेले असून विविध दुरुस्ती करताना निघालेले टाकाऊ लाकडी व इतर सामान स्टोअर रूममध्ये ठेवण्यात येते. याच रूमला मंगळवारी (ता.5) अचानक आग लागली होती. दुपारी तीव्र उन्हाच्या वेळेत दोन ते तीनच्या दरम्यान आग लागली होती. स्थानकाच्या बाहेर अनेक वर्षांपूर्वीचा हा स्टोअर रूम असून यात आयओडब्ल्यूचे अनेक वर्षांचे रेल्वेचे जुनी सागवनी लाकडे होती. पेटलेल्या लाकडातून अग्निज्वालांनी उग्र रूप धारण केले. याचवेळी धुराचेही लोट आकाशात झेपावत होते. पुढे काय होणार हे पाहून घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या रेल्वे कर्मचार्यांसह नागरिक भयभीत झाले होते.

मात्र, दुपारी पुणतांबा सेक्शनवर कामाकरिता ब्लॉक घेतलेला होता. याचवेळी लखनौ-पुणे एक्सप्रेस गाडी पुणतांबा रेल्वे स्थानकावर उभी होती. पण लागलेल्या आगीची तीव्रता लक्षात येताच या एक्सप्रेसला पुढे सोडण्याची तत्परता दाखवली. त्यामुळे अनर्थ टळला. रेल्वे स्थानकावरील यंत्रणेने मारुती मंदिराच्या परिसरातील कामासाठी उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरमधील पाण्याने ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येत असतानाच राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर येथील अग्निशमन गाड्या दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, ही आग कशामुळे लागली आणि आगीत किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असल्याचे स्टेशन मास्तर डी. के. बिस्वास यांनी सांगितले.
