एक पितो.. दोन नेतो.. आणि रस्त्यावरच्या हातगाड्यावरच भुर्जी खातो! कसाबकडून वीज कंपनीच्या इभ्रतीचाच पंचनामा; मुंबईच्या पथकाने पकडलेल्या चोर्यांमध्येही तडजोड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्टाचारात आकांत डुंबलेल्या वीज वितरण कंपनीच्या ‘कसाब’चे एकामागून एक किस्से समोर येत असतांनाच आता तो वीज वितरण कंपनीच्या अब्रुचे धिंदवडेही काढीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कसाब दिवसा ठेकेदाराच्या बिर्याणीवर ताव मारल्यानंतर संध्याकाळी ‘पार्सल’साठीही बकरा शोधीत असल्याचे व त्याच्याकडूनच दुसर्या दिवसाचीही व्यवस्था करुन घेत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ‘व्होडका’ मद्य पिवून संध्याकाळी तर्राट होणारा हा कसाब बकर्याकडून तीन बाटल्या मिळवतो, त्यातील एक बाटली रस्त्यावरील अंडाभुर्जीच्या गाड्यावरच पडद्यामागे रिचवून उर्वरीत दोन बाटल्या आपल्या पाठीवरील सॅकमध्ये घालून नाशिक गाठीत असल्याचा प्रकारही आता वीज कंपनीच्या वर्तुळातून समोर आला आहे. कंपनीच्या इंभ्रतीचा दररोज पंचनामा करणार्या या अधिकार्यावर मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याने संगमनेरातून मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सर्वसामान्यांपासून प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या वीजेबाबत दैनिक नायकने गेल्या दोन दिवसांपासून वृत्तमाला सुरु केली आहे. या वृत्तमालेतून संगमनेर उपविभागातील भाग एकमध्ये कार्यरत असलेल्या आणि संपूर्ण वीज कंपनीत चक्क ‘कसाब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या उपकार्यकारी अभियंत्याचे विविध कारनामे समोर येत असून येथील कार्यकाळात या महाशयांनी भ्रष्टाचार सोडून दुसरे काहीच काम केल्याचे दिसून येत नाही. असे असतांनाही हा अधिकारी चार-चार वर्ष एकाच ठिकाणी ऐटीत राहतोय, सरकारचा आणि पर्यायाने जनतेचाच भलामोठा पगारही गिळतोय आणि सोबत सर्वसामान्य वीज ग्राहकांचे रक्तही पितोय. एव्हढं सगळं करुनही त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्याच्या भ्रष्टाचारात कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांचाही तर वाटा नसतो ना? अशी शंकाही आता संगमनेरातून व्यक्त केली जात आहे.

वीज कंपनीच्या खोदकामातून कसाब सारख्या क्रूरकर्म्याच्या नावाने ओळखल्या जाणार्या या महाशयांचे किस्से सोडून दुसरे काहीच बाहेर पडतं नसल्याचे चित्र दिसत असून गुरुवारी त्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज चोरी आणि वीज गळतीच्या बाबतीत संगमनेर शहर विभाग गेल्या काही वर्षात डेंजर झोनमध्ये आला आहे. मात्र असे असतांनाही स्थानिक अधिकारी ती रोखण्यात अपयशी ठरल्याने अखेर कंपनीच्या महासंचालकांनीच थेट मुंबईहून संगमनेरला विशेष पथक पाठविले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात तळ ठोकून असलेल्या या पथकातील कर्मचारी दररोज आपले कर्तव्य पूर्ण करतांना मीटरमध्ये छेडछाड, मंदगतीने चालणारे मीटर, आकडे टाकून बेकायदा वापरली जाणारी वीज असे प्रकार हुडकून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव याच ‘कसाब’कडे सोपवितात.

अशाप्रकारचे प्रस्ताव केवळ खाण्यासाठीच जन्म झालेल्या कसाबसाठी आयती संधी ठरत असून संबंधितांना कंपनीत बोलावून त्यांच्याकडून तडजोड करुन मलिदा लाटण्यातही ही व्यक्ती आघाडीवर आहे. वास्तविक शहरातील आठ उपविभागात होणारी वीजचोरी, गळती रोखण्याची, मीटरची नियमित तपासणी करण्याची संपूर्ण जबाबदारी या कसाबची आणि त्याच्या हाताखाली काम करणार्या आठ कनिष्ठ अभियंत्यांची आहे. मात्र ते आपले कर्तव्यच पूर्ण करीत नसल्याने चक्क वीज कंपनीच्या महासंचालकांनाच कारवाईसाठी विशेष पथक पाठविण्याची वेळ आली. त्यावरही कहर म्हणजे या पथकाने पकडलेल्या वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी हा कसाब त्यांच्याशीही तडजोडी करीत असल्याने महासंचालकांच्या पथकाने केलेल्या कामगिरीवर पाणी फेरले जात आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला हा प्रकार महासंचालकांसह कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांनाही समजत नसल्याने मोठा संशय निर्माण झाला आहे.

दुपारच्या जेवणासाठी अन्नदाता म्हणून ठेकेदार नावाचा बकरा मिळाला तरच ‘बिर्याणीवर’ ताव मारणार्या या कसाबचा आता अत्यंत धक्कादायक आणि वीज कंपनीच्या इभ्रतीचा पंचनामा करणारा प्रकार समोर आला आहे. ही व्यक्ती ज्यादिवशी दिवसभर संगमनेरात थांबते, त्या दिवशी सायंकाळच्या ‘मद्या’साठीही ‘दाता’ शोधते. सावज हाती लागताच ‘वाईन शॉप’मधून एकूण तीन ‘व्होडका’ मद्याच्या बाटल्या घेतल्या जातात. त्यानंतर इतक्या वरीष्ठ पदावर काम करणारा हा अधिकारी चक्क महामार्गाच्या लगत असणार्या चायनीज फूड अथवा अंडाआम्लेटच्या हातगाड्यांवर जावून तेथेच बेकायदेशीरपणे पडद्यामागे तोंड लपवून तीन बाटल्यातील एक बाटली रिचवतो, नंतर अंडाभुर्जी खातो आणि राहिलेल्या दोन मद्याच्या बाटल्या आपल्या पाठीवरील सॅकमध्ये घालून चक्क उद्याची सोय म्हणून सोबत घेवून जातो. वीज कंपनीची लक्तरे वेशीवर टांगणारा हा प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरु असतानाही वरीष्ठ अधिकार्यांचा त्याकडे कानाडोळा हे न उकलणारं कोडं असून या प्रकरणात आता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीच हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे.

