नायगावमध्ये धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्याही जेरबंद वन विभागाची यशस्वी कामगिरी; नागरिकांची दहशतीतून मुक्तता
नायक वृत्तसेवा, सिन्नर
तालुक्यातील नायगाव खोर्यात धुमाकूळ घालणार्या बिबट्यांपैकी आणखी एक बिबट्या सलग दुसर्या दिवशी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांनी मंगळवारी (ता.१०) एका बिबट्याला जेरबंद केले. यामध्ये अजून बछडे बाहेर असल्याचे समजते. मात्र मोठा बिबट्या जेरबंद केल्यामुळे शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नायगाव परिसरातील जोंगलटेंभी, देशवंडी, बाम्हणवाडे, जायगाव, वडझिरे, सोगगिरी या गावांची मुख्य बाजारपेठ नायगाव आहे. नायगावहून नाशिकरोड-सिन्नर-सायखेडा-निफाडला जाण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे लोकांची ये-जा चालूच असते. गोदावरी नदी आणि उसाचे वाढलेले क्षेत्र यामध्ये दबा धरून हा बिबट्या आपले सावज शोधतो असतो. त्यामुळे सिन्नर वन विभागाने बिबट्या शोधा अन् पकडा मोहीम सुरू केली होती. याच दरम्यान रात्रीच्या वेळी देशवंडीचे भगवान बर्के यांच्या तीन शेळ्या व सायखेडा रस्त्याला त्र्यंबक भांगरे यांची शेळीची शिकार बिबट्यांनी केली. त्यामुळे मादी नर बिबट्यासह त्यांची बछडे असेल असा अंदाज वनरक्षक संजय गिते यांनी व्यक्त केला होता. तत्पूर्वी नायगाव कांदा मार्केटजवळ त्र्यबक भांगरे यांच्या वस्तीवर त्याला पकडण्यात आले.
या कामगिरीमध्ये उपवनसंरक्षक पंकज गर्ग, नाशिक पश्चिम सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक संजय गिते, गोविंद पंढरी, वनसेवक बालम कुराडे, रोशन जाधव, मधु शिंदे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून या भागात बिबट्याने मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडलेला होता. जवळपास नऊ हल्ल्यांमध्ये १२ जण जखमी झाले होते. बर्याच ठिकाणी पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला केला होता. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत होते. सायंकाळी सातच्या नंतर घराबाहेर पडण्यास कुणीही धजावत नव्हते. त्यामुळे वन विभागाने देखील कठोर पावले उचलत पाच पिंजरे बंदोबस्तासाठी लावले होते. त्याचबरोबर सहा ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी ज्याठिकाणी पहिला बिबट्या जेरबंद झाला त्याच ठिकाणी लावलेल्या दुसर्या पिंजर्यात दुसरा बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.