संगमनेरच्या वीज वितरण कंपनीच्या ‘भोंगल’ कारभाराचा ‘अजब’ नमूना! मोठ्या व्यापार्‍याचे कनेक्शन तोडले; वेळेत पैसे भरुनही लग्न घरात दाटला अंधार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
झोपडीपासून ते अलिशान महालांमध्ये राहणार्‍यांपर्यंत प्रत्येकाशी संलग्न असूनही नेहमीच रोषाचे कारण ठरणार्‍या, भ्रष्टाचार आणि कामचुकारीतही आपला ठसा उमटवलेल्या संगमनेरच्या वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा अजब नमूना आज बघायला मिळाला. या घटनेत संगमनेरातील प्रतिष्ठीतांच्या यादीत अग्रणी असलेल्या शहरातील एका मोठ्या व्यापार्‍याला लग्नकार्याच्या निमित्ताने घरात जमलेल्या पाहुणे मंडळीसमोरच मनस्ताप करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे सदरचा व्यापारी वितरण कंपनीचा जूना आणि नियमित ग्राहक असतांनाही एखाद्या नशेतील माणसाने करावी तशी चूक करीत विद्युत कर्मचार्‍यांनी त्यांचा वीज जोड तोडला. दोन तासांनी आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याच कर्मचार्‍यांनी पुन्हा धावपळ करीत त्यांचा वीज जोड नियमित केला खरा, मात्र या घटनेने संगमनेरच्या वीज वितरण कंपनीची लक्तरे वेशीवर आणून टांगली गेली.


श्रीगोपाळ पडताणी हे नाव माहिती नसलेला क्वचितच एखादा इसम संगमनेर शहरात आढळेल. त्यांच्याच बाबतीत हा प्रकार घडला आहे. गेल्या शनिवारी (ता.26) त्यांच्या चिरंजीवाचा लग्नसोहळा घोटी येथे मोठ्या आनंदात पार पडला. रविवारी (ता.27) या मंगलकार्या निमित्त त्यांनी संगमनेरात स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. पडताणी परिवारात मोठ्या कालावधीनंतर लग्नकार्य होत असल्याने व त्यातच एकुलत्या एक मुलाचा लग्नसोहळा असल्याने राज्यासह परराज्यात वास्तव्यास असलेले त्यांचे असंख्य नातेवाईक, मित्रमंडळी व काही निवडक मोठे व्यापारीही या कार्यक्रमासाठी संगमनेरात आलेले होते.


या सोहळ्यानिमित्त पडताणी परिवाराने बाजारपेठेतील आपल्या अलिशान महालावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने संध्याकाळच्या वेळी हा संपूर्ण परिसर अतिशय देखणा भासत होता. मात्र त्याचा हाच देखणेपणा वीज वितरण कंपनीच्या डोळ्यात खूपला आणि सोमवारी (ता.28) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नशेत असल्यागत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बाजारपेठेत पोहोचले आणि त्यांनी चक्क पडताणी यांच्या याच अलिशान महालाचा वीज जोड कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर तोडून टाकला.


अचानक वीज गायब झाल्याने नेहमीप्रमाणे गेली असेल, येईल थोड्या वेळात असे समजून घरातील मंडळींनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहीले नाही. या कालावधीत घरातील वृद्ध पाहुणे मंडळींना मात्र वीज नसल्याने पायर्‍यांचा वापर करुनच खाली-वर जावे-यावे लागले. जवळपास दोनतास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने पडताणी यांच्याकडील सेवकांनी आसपास चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. वास्तविक सोमवारी सकाळपासून या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झालेलाच नव्हता, तर वीज कर्मचार्‍यांनीच येवून पडताणी यांचा वीज जोड तोडल्याची बाब यावेळी समोर आली.


वीज जोड का तोडला? याचे कारण मात्र कोणालाही ज्ञात नसल्याने घरातील सर्व माणसं एकमेकांकडे पाहू लागली. खुद्द पडताणी यांनी वितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करुन विचारणा केली असता त्यांना धक्कादायक माहिती देण्यात आली. संबंधित कर्मचार्‍याने ‘तुम्ही वीज वापरापोटीचे गेल्या महिन्याचे बिल अद्याप भरले नसल्याने वीज जोड कापण्याची कारवाई झाली’ असे त्यांना सांगण्यात आले. ते ऐकून धक्का बसलेल्या पडताणी यांनी आपल्यावरच शंका घेत ‘लग्नाच्या गडबडीत तर राहीले नाही ना?’ असा प्रश्‍न स्वतःलाच विचारीत आपल्या चाकरांकडे चौकशी केली.


त्यातूनही खळबळजनक माहिती समोर आली. वीज कंपनीकडून पडताणी यांना चालू महिन्याच्या पहिल्याच दिवशी 3 हजार 500 रुपयांचे वीज वापरापोटीचे बिल देण्यात आले होते. पंधरा-वीस दिवसांनी घरात लग्नकार्य असल्याने गडबडीत राहून जायला नको म्हणून त्यांच्या दुकानातील व्यवस्थापकांनी दुसर्‍याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबररोजी ती रक्कम ऑनलाईन पद्धतीने वीज कंपनीच्या खात्यात जमाही केली होती. म्हणजेच कंपनीने दिलेल्या मुदतीच्या आधीच देयक अदा करुनही वीज कंपनीच्या नशेत फिरणार्‍या कर्मचार्‍यांनी हा प्रताप केल्याचे उघड झाले.


यानंतर वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांकडे याबाबत चौकशी करुन त्यांना वास्तवाचे दर्शन घडवल्यानंतर तब्बल तीन तासांनी पडताणी यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. या घटनेने मुलाच्या लग्नकार्याच्या निमित्ताने आनंदात असलेल्या पडताणी परिवाराच्या उत्साहावर एकाप्रकारे वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने विरझन टाकण्याचेच काम केले होते. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या महालाचे वीज बिल आजवर कधी मागे राहीले होते का?, आपण ज्यांचा वीजजोड तोडण्यासाठी आलो आहोत त्यांनी खरोखरी देयक अदा केले नाही की अन्य काही कारण आहे? याबाबत किमान एकदा चौकशी होणे अथवा अमुक-तमुक कारणाने तुमचा वीज जोड कापला जात असल्याची सूचना तरी त्या कर्मचार्‍यांनी देणे आवश्यक असतांना असा कोणताही प्रकार घडला नाही. त्यामुळे लग्नकार्याच्या निमित्ताने आनंदाने भरलेल्या पडताणी परिवाराला पाहुणे मंडळींच्या समोरच मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.

Visits: 203 Today: 2 Total: 1104277

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *