अल्पवयीन मुलीस लग्नासाठी विकणारी टोळी पकडली शेवगाव पोलिसांची मध्य प्रेदशात जावून दमदार कामगिरी
नायक वृत्तसेवा, शेवगाव
अत्याचार करून अल्पवयीन मुलीस लग्नासाठी विकणारी टोळी मध्य प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेवगाव पोलिसांनी जेरबंद केली. टोळीतील दलाल गजानन काशिनाथ बिडे (वय 35, रा. रोई, ता. अंबड), लक्ष्मण तुकाराम पवार (वय 58, रा. जयभवानीनगर, औरंगाबाद), अनिल रमेशचंद्र चौधरी (वय 25), मुकेश रमेशचंद्र चौधरी (वय 27, रा. धमनार, ता. दलौंदा, जि. मंदसौर, मध्य प्रदेश), अर्जुन जगदीश बसेर (वय 25, रा. दमदम, मंदसौर, मध्य प्रदेश) अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दलाल फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शेवगाव तालुक्यातील एका गावात दहावीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी जागरण-गोंधळासाठी औरंगाबादला गेली. मात्र, ती पुन्हा घरी आली नाही, अशी फिर्याद मुलीच्या आईने शेवगाव पोलीस ठाण्यात 17 नोव्हेंबर रोजी दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. ही मुलगी औरंगाबाद येथे गजानन काशिनाथ बिडे याच्याकडे जागरण-गोंधळासाठी आली असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर बिडे व लक्ष्मण पवार यांनी त्या मुलीला प्रतापगड (राजस्थान) येथील दलाल भवरसिंग ठाकूर व लोकेश चौधरी यांच्यामार्फत मध्य प्रदेशातील धमनार (ता. दलौंदा) येथे अनिल चौधरी याच्याबरोबर लग्न लावण्यासाठी दीड लाख रुपयांना विकल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी व नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस नाईक संतोष काकडे, सचिन खेडकर, ज्ञानेश्वर सानप, वृषाली सानप यांच्या पथकाने दलौंदा पोलिसांच्या मदतीने धमनार येथे जाऊन अनिल चौधरी यांच्या घरामध्ये छापा टाकला. तेथे अल्पवयीन मुलगी पोलिसांनी ताब्यात घेतली.
पोलिसांनी बिडे, पवार, बसेर, नवरा मुलगा अनिल व त्याचा भाऊ मुकेश चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. फरार भवरसिंग ठाकूर, लोकेश चौधरी यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सोमवारी (ता. 21) पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलहस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.