सिद्धी हॉस्पिटलमध्ये ‘सन्मान उपचार योजना’! आजपासून मिळणार लाभ; ज्येष्ठ नागरिक व लष्करी जवानांचा समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैद्यकीय क्षेत्रात सामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या चर्चा समाजात नेहमीच झडत असतांना एका वैद्यकीय व्यावसायिकाने अतिशय सकारात्मक आणि दिशादर्शक उपक्रमाची रुजवात केली आहे. आपल्या वडिलांच्या जयंतीचे निमित्त साधून संगमनेरातील डॉ. अमोल कासार यांनी आपल्या सिद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपासून ‘सन्मान उपचार योजना’ सुरु केली आहे. या माध्यमातून समाजातील निराधार वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान आणि त्यांच्या कुटुंबाला या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. आजपासून सुरु झालेल्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारात पन्नास टक्के तर सैन्य दलांच्या उपचार खर्चात शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मुख्यालयानंतर सर्वाधिक आधुनिक आणि सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये संगमनेर अग्रक्रमी आहे. शहरात अगदी आयुर्वेदापासून युनानी पद्धतीने उपचार करणार्‍यांची जेवढी संख्या आहे, त्याहून कितीतरी अधिक मोठी संख्या आधुनिक विषम चिकित्सा (अलोपॅथी) प्रणालीचा वापर करुन उपचार करणार्‍यांची आहे. शहरातील विविध भागात वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारी अत्याधुनिक रुग्णालयेही निर्माण झाल्याने वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने संगमनेर शहर महानगरांच्या पंक्तीत जावून बसले आहे.

अशा रुग्णालयांमध्ये समावेश असलेल्या गणेशनगर परिसरातील सिद्धी हॉस्पिटलमध्ये आजपासून (ता.11) समाजातील निराधार ज्येष्ठ नागरिक व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांसाठी ‘सन्मान उपचार योजना’ सुरु करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतींना वंदन करण्याच्या हेतूने डॉ.अमोल कासार यांनी सुरु केलेल्या या योजनेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अथवा मुलं-बाळं नसल्याने सांभाळ होत नसलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून रुग्णालयातील उपचार खर्चात पन्नास टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. मात्र रुग्णांना औषधांची व आवश्यकता भासल्यास लागणार्‍या ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरची पूर्ण रक्कम अदा करावी लागेल.

ज्येष्ठ नागरिकांसोबतच डॉ. कासार यांनी देशासाठी समर्पित भावनेने सेवा बजावणार्‍या भारतीय सैन्य दलातील प्रत्यक्ष सीमेवर लढणार्‍या जवानांसह त्यांची पत्नी व मुलांचाही या योजनेत समावेश केला आहे. अशाप्रकारे देशसेवा करणार्‍या जवानांना अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयीन उपचारांची गरज भासल्यास सिद्धी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरील उपचारासाठी कोणतेही शुल्क आकरले जाणार नाहीत. मात्र त्यांना औषधांची व गरज भासल्यास लागणार्‍या ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरची पूर्ण रक्कम द्यावी लागेल. आजपासून ही योजना सुरु राहणार आहे.

डॉ.अमोल कासार म्हणजे संगमनेरातील सामाजिक चेहरा असून दरवर्षी सीमावर्ती भागात जावून ते लष्करात कार्यरत असलेल्या जवानांच्या आरोग्य शिबिरांचेही आयोजन करीत असतात. कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या कालखंडात त्यांनी संगमनेरकरांसाठी भरीव योगदानही दिले आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा खासगी वैद्यकीय व्यावसायिक कोविड रुग्णांवर उपचार करण्यास धजावत नव्हते, त्यावेळी त्यांनी डॉ. विनोद आव्हाड, डॉ. किशोर पोखरकर यांच्यासारख्या समव्यावसायिकांना सोबत घेवून स्थानिक आरोग्य विभागासोबत खांद्याला खांदा देवून काम केले. संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयात त्यांच्याच पुढाकारातून कोविड रुग्णालय सुरु झाले होते. आता सामाजिक भावनेतून त्यांनी ‘सन्मान उपचार योजना’ सुरु केली असून त्यातून समाजात सकारात्मक संदेश जाण्यास मोठी मदत होणार आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 30614

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *