रामपूरचे उपसरपंच साबळेंचा अटकपूर्व जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला पाणी चोरी प्रकरण; सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ
![]()
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील रामपूर येथे शासकीय पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून चोरुन नळजोडणी घेऊन पाणी चोरी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले राहुल रावसाहेब साबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी (ता.5) फेटाळला आहे.

रामपूरच्या ग्रामविकास अधिकारी प्रतिभा भरसाकळ यांनी साबळे यांच्या अनधिकृत नळजोडणीचा पंचनामा करून, गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने राहुरी पोलीस ठाण्यात पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने साबळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 मार्च रोजी साबळे यांना तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

याप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राजकीय कारणामुळे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. आरोपी साबळे चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती केली. सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी वरील निकाल दिला. आरोपीतर्फे अॅड.आर. एन. धोडे व अॅड.प्रवीण दिवे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे अॅड.एस. डब्ल्यू. मुंढे यांनी बाजू मांडली. आरोपी राहुल साबळे हे अहमदनगर जिल्हा बँक व डॉ.तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे चिरंजीव आहेत. रामपूरचे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे किंवा पोलिसांपुढे हजर होऊन, अटक होणे एवढेच दोन पर्याय आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
