लक्षणे असणार्या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करा ः थोरात संगमनेरातील कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रुपाने माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. म्हणून कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रत्येकाने शासकीय निर्बंधांचे कडक पालन करावे. तसेच कोरोनाची लक्षणे आढळणार्या व्यक्तींचे उपचारांसाठी तातडीने विलगीकरण करावे, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोना उपाययोजना आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, बेबी थोरात, बी.आर.चकोर, सुरेश थोरात, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदी उपस्थित होते.

प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. मात्र, नागरिकांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात घरोघर तपासणी केली जात आहे. आजाराचे कोणतेही लक्षण असलेल्या व्यक्तीचे तातडीने विलगीकरण करा. कारण घरात एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते मग अवस्था वाईट होते. म्हणून कोणीही निष्काळजीपणा करू नका. ऑक्सिजन पुरवठा व मूलभूत औषधे पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण वरीष्ठ स्तरावरून प्रयत्न केले आहेत. आता गरज आहे ती प्रत्येकाने जागरूक होत आपल्या परिसरात आपल्याजवळ कुणालाही कोणत्याही आजाराची काही लक्षणे आढळली तर त्याचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्याची. त्यासाठी प्रत्येक गावात ग्राम आरोग्य सुरक्षा दलाने अधिक कार्यक्षमपणे काम करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त तपासणी करून रुग्ण शोध मोहीम अधिक प्रभावी करा. याच बरोबर नागरिकांचे लसीकरण करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात कोरोनामुक्त गावाकडे प्रत्येक गावाची वाटचाल होण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन महसूल मंत्री थोरात यांनी केले. तर आमदार डॉ.तांबे म्हणाले, कोणत्याही आजाराचे लक्षण असले तर प्रत्येकजण सीटीस्कॅनसाठी आग्रह करत आहे. त्याऐवजी आवश्यक ठिकाणी एक्स-रे ही काढा. आजाराबाबत हलगर्जीपणा करू नका. स्कॅनसाठी एकाच ठिकाणी गर्दी करू नका. जितक्या लवकर आपण उपचार घेतो तितक्या लवकर आपण कोरोनातून मुक्त होतो.

लसीकरण उपकेंद्रांवर होण्यासाठी नियोजन करा..
कोरोना संपुष्टात आणण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून आपण मोफत लसीकरणासाठी सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. आता आरोग्य केंद्रावर लसीकरणाकरिता नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी तालुक्यात उपकेंद्रांवर दिवस निवडून लसीकरणाचे नियोजन करावे. तसेच जेवढे लसीकरण आहे तेवढ्याच नागरिकांना एक दिवस आगोदर निरोप द्यावा अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला केली.
