पुणे विद्यापीठाचा पहिल्या दिवशीच सावळा गोंधळ उघड
पुणे विद्यापीठाचा पहिल्या दिवशीच सावळा गोंधळ उघड
नायक वृत्तसेवा, राहुरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून (ता.12) सुरू झाल्या. परंतु, पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळाचा फटका राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे.
निर्धारित वेळेपेक्षा एक ते सात तास उशिरा प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पोहोचल्या. काही विषयांच्या प्रश्नपत्रिका काही महाविद्यालयांना दिवसभर पोहोचल्याच नाहीत. काही प्रश्नपत्रिका अर्ध्या मराठी, अर्ध्या इंग्रजी भाषेत; तर काही प्रश्नपत्रिका समजण्या पलिकडच्या लिपीत होत्या. त्यामुळे महाविद्यालयात दिवसभर उपाशी बसूनही अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुणे विद्यापीठाकडून ई-मेलद्वारे महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका पाठविण्याचे काम सुरू झाले. परंतु, त्यात प्रचंड गोंधळ उडाला. बीएस्सीच्या (कम्प्युटर सायन्स) द्वितीय वर्षाच्या अप्लाइड अल्जेब्रा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा ई-मेल काही महाविद्यालयांना दिवसभर पोहोचलाच नाही. काही महाविद्यालयांना एक ते सात तास उशिरापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्या. त्यात प्रश्नपत्रिकेवर विषयाचे नाव अल्नेब्रा आणि प्रश्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आले. एमबीएच्या अंतिम वर्षाच्या सकाळी दहा व दुपारी चार वाजताच्या दोन प्रश्नपत्रिका काही महाविद्यालयात दिवसभर पोहोचल्याच नाहीत. एम. ए. अंतिम वर्षाची इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका सकाळी दहा ऐवजी सायंकाळी चार वाजता आली. ती देखील मराठी ऐवजी इंग्रजी भाषेत आली. एम. ए. मराठी विषयाचा अर्धा पेपर मराठीत तर अर्धा इंग्रजीत आला. काही प्रश्नपत्रिका यूनिकोडमध्ये नसल्याने, मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका इंग्रजी व अगम्य अशा वाचता न येणार्या भाषेत मेल द्वारे पोहोचल्या. त्यामुळे, सकाळी आठ वाजल्यापासून आलेले विद्यार्थी दिवसभर उपाशी राहून सायंकाळी पाच वाजता परीक्षा न देता घरी परतले.