राज्यस्तरीय शिबिराची शरद पवारांच्या भाषणाने सांगता मंथन शिबिरातून राष्ट्रवादीने काय मिळविले; रंगतेय चर्चा
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीची चर्चा राज्यभर होऊ लागली आणि त्यातच शिर्डीत राष्ट्रवादीचे दोन दिवसीय मंथन शिबिर आयोजित करण्यात आल्याने पक्ष फुटीच्या भीतीने राष्ट्रवादीने मंथन शिबिर आयोजित केल्याची चर्चा सुरू झाली. ज्या ज्या वेळी राष्ट्रवादीवर संकटे येतात त्या त्यावेळी शरद पवार कोणत्याही परिस्थितीत हिमालया सारखे उभे राहतात, विधानसभेच्या निवडणुकीत पावसातील पवारांचा भाषण आणि राज्यात बदलेली राजकिय परिस्थिती आपण बघितलेलीच आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजारपणामुळे पवार यांना जास्त बोलता आले नाही. त्यांचे उर्वरित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचले. सायंकाळी पवार पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईतील रुग्णालयात रवाना झाले. मात्र दोन दिवसीय मंथन शिबिरातून राष्ट्रवादीने काय मिळवले याची चर्चा रंगू लागली.
शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय शिबिराची शरद पवारांच्या भाषणाने शनिवारी सांगता झाली. या वेळी राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, खासदार अमोल कोल्हे यांची गैरहजेरी जाणवत होती. पवार म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात पंडित नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांनी देशाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले. मात्र, भाजपच्या राजवटीत देशातील सांप्रदायिकता धोक्यात आणली जात आहे. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या विचारांची सरकारे असली तरी सत्तेचा मान राखला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून असंवैधानिकरीत्या राज्यातील सत्ता हस्तगत केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दोन दिवसीय मंथन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती आखण्यावर भर दिलं गेलं. विधानसभा निवडणुकीसाठी मिशन हंड्रेड यशस्वी करण्यावर चर्चा झाली. नाराज नेत्यांची आणि आमदारांची मन जुळवण्याचे प्रयत्न झाले. पक्ष फुटीच्या चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व मंथनातून राष्ट्रवादीने काय मिळवलं?याचीच जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
दोन दिवसीय मंथन शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांना सभा स्थळापासून दूरच रोखण्यात आले व सभेत प्रवेश दिला गेला नाही. दुसर्या दिवशी शरद पवारांच्या भाषणावेळी प्रसारमाध्यमांना प्रवेश दिला गेला. पहिल्या दिवशी असं काय वेगळं घडणार होतं की प्रसार माध्यमांना दूरच रोखण्यात आलं. आणि पहिल्या दिवशी इतकी गुप्तता का पाळली गेली. पहिल्या रांगेतील नेत्यांचे चित्रीकरण सुद्धा मंचावरील स्क्रीनवर दाखवले जात नव्हते, या मंथन शिबिरात इतकी गुप्तता का पाळली गेली असंच प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवारांच्या भाषणावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवले.
अजित पवारांचे कट्टर समर्थक प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यात बळीचे राज्य येणार असल्याची प्रतिक्रिया दिली. आगामी राज्यातील राजकारणाची नांदी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधोरेखित केली. मिटकरी यांच्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कानावर हात ठेवले. व्यक्तिगत संबंध आणि राजकारण वेगळे विषय आहेत. पवार ज्येष्ठ नेते असल्याने मुख्यमंत्री पवारांच्या भेटीस हॉस्पिटलमध्ये जाण्यात गैर काय आहे? या भेटीतील राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील सरकार पडणार?
काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की, शिर्डीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शिर्डीत शिबिरे घेऊन सरकार पडणार असेल तर आताही तसेच काहीतरी होईल राष्ट्रवादीच्या शिबिरानंतर राज्यातील सरकार पडेल.