प्रशासनाकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी! शहरात सात ठिकाणी कृत्रिम हौद तर पंचवीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड या वैश्‍विक महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने शासनाने गेल्या मार्चपासून देशातील सर्वच धार्मिक व सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवातही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आली आहे. गणपती बाप्पांच्या दहा दिवसांच्या मुक्कामानंतर विसर्जनासाठीही नियमांचे पालन बंधनकारक असून त्यासाठी प्रशासनाने गर्दी न होता श्रींच्या विसर्जनाची तयारी केली आहे. त्यासाठी शहरातील सात ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांसह पंचवीस ठिकाणी श्रींच्या मूर्ती संकलित करण्याची सोय करण्यात आली आहे. यंदा कोणालाही थेट नदीपात्रात जावून श्रींचे विसर्जन करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


देशासह राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. संगमनेरातील रुग्णसंख्येतही गेल्या दोन महिन्यात तब्बल तेराशे रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारद्वारा देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तरुणाईचा जल्लोश समजल्या जाणार्‍या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक उत्सवावर यंदा मोठ्या प्रमाणावर मर्यादा आणण्यात आल्या असून संगमनेरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याची ग्वाही दिली आहे.


सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठीही यंदा मर्यादा लागू असून कोणाही व्यक्तिला परस्पर नदीपात्रात जावून श्रींचे विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. घरगुती गणपती मूर्तींचे संकलन करण्यासाठी प्रभागनिहाय संकलन केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार असून विसर्जनाच्या दिवशी या केंद्रांवर मूर्ती देता येतील. सर्व मूर्ती एकत्रित केल्यानंतर पालिकेच्यावतीने त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी त्याचे पालन करावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


या ठिकाणी उभारले जाणार तात्पुरते कृत्रिम हौद..

01) जनतानगर प्राथमिक शाळेचे मैदान 02) जाणता राजा मैदान 03) रणजीत स्पोर्टस् मैदान (रंगारगल्ली) 04) साटम मठ, बालमघाट (चंद्रशेखर चौक) 05) शाळा नं.1 भारत चौक 06) नेहरु उद्यान जलकुंभ 07) पोफळे मळा, बी.एड्.कॉलेजजवळ या सात ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


याशिवाय संगमनेर शहर व आसपासच्या ग्रामीणभागासाठी श्रींच्या मूर्ती संकलित करण्यासाठी..

01) चंद्रशेखर चौक 02) जयहिंद सर्कल, मालदाड रोड 03) गणेश उद्यान, गणेशनगर 04) चव्हाणपूरा, रंगारगल्ली 05) इंदिरानगर 06) बसस्थानकासमोर 07) मालपाणी विद्यालयाजवळ, अकोले रोड 08) नेहरु चौक 09) आशीर्वाद पतसंस्थेजवळ, शिवाजीनगर 10) बी.एड्.कॉलेजसमोर 11) कॅ.लक्ष्मी चौक, रंगारगल्ली 12) स्वातंत्र्य चौक 13) भूमि अभिलेख कार्यालयाजवळ


घुलेवाडी परिसरातील गणपती मूर्ती संकलनासाठी..

01) गणेशविहार, मालदाड रोड 02) शंकर टाऊनशिप 03) मालपाणी नगर 04) घुलेवाडी गावठाण

गुंजाळवाडी व ढोलेवाडी परिसरासाठी..

01) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ 02) हॉटेल सुप्रिमजवळ, रहाणेमळा 03) केशवनगर, वरचा रहाणेमळा 04) गोल्डन सिटी प्रवेशद्वार 05) ढोले पाटील लॉन्स, ढोलेवाडी 06) शारदा बेकरीजवळ, निर्मलनगर


संगमनेर खुर्द परिसरातील मूर्ती संकलनासाठी..

01) मॅथॅडिस्ट चर्च चौक 02) यशवंतनगर, वैदूवाडी
वरील केंद्रावर प्रशासनाच्यावतीने मूर्ती संकलन केल्या जाणार असून शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांनी नियमांच्या अधीन राहुन आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती याच केंद्रांवर जमा करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1103451

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *