राजूरमधील अवैध दारूविक्रीवर पोलिसांची छापेमारी हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त तर अनेकांना केली अटक
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री, मटका, जुगार याचा हैदोस सुरू असून दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा देताच नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने दहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. मात्र स्थानिक पोलीस पानाला चुना लावत असल्याचा आरोप दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
एकाच दिवशी पोलिसांनी 10 दारू गुत्त्यावर कारवाया केल्या आहेत. त्यात तडीपार आरोपी संजय अदालतनाथ शुक्ला (राजूर, रा. दिगंबर रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, वारंघुशी येथे छापा टाकून सुनीता सुखदेव पंडित (रा. वारंघुशी, ता. अकोले) वाकी येथून सोमनाथ धर्मा कवटे (वाकी बंगला, राजूर) देवठाण येथून देवराम लहानू सामेरे (देवगाव, ता. अकोले) केळुंगण येथून नवनाथ नामदेव लांघी, भगवान रामचंद्र मुर्तडक (रा. रंधा खुर्द, राजूर), राजूर येथून जंगीलाल अमृतलाल बिंद आणि शिसवद येथून रमेश देऊ पोरे यांना अटक केली आहे. या व्यतिरिक्त 10 ते 12 कारवाया असून यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने रात्री अचानक राजूरमध्ये धाड टाकली. त्यांनी संजय अदालतनाथ शुक्ला याच्या घरात भुयार करून दारू त्यात 40 हजार रुपयांची दारू लपविण्यात आली होती. त्यामुळे, कट्टर दारू विक्रेता शुक्ला यास पोलिसांनी अटक केली आहे. शुक्ला यास पूर्वीच तडीपार म्हणून घोषित केले होते. मात्र, त्याने तडीपारी रद्द करून दारू विकणार नाही असे हमीपत्र लिहून दिले होते. मात्र, झाले काय? दोन दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांनी छापा टाकला आणि तिसर्या दिवशी नाशिकच्या पथकाने पुन्हा कारवाई केली. यावरुन दारूविक्रेते किती सराईत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे, अशा व्यक्तींची तडीपारी पुन्हा करुन ते हमीपत्र रद्दबातल केले पाहिजे. पोलिसांनी प्रस्ताव पाठवून प्रांताधिकार्यांनी या गोष्टीकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी दारूबंदी चळवळीने केली आहे. तसेच याच पथकाने केळुंगण परिसरातील कोल्हार-घोटी रस्त्याजवळील हॉटेल हिरा येथे छापा टाकला. त्यात एकनाथ नामदेव लांघी (वय 22, रा. केळुंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा हॉटेल हिराचा मालक व नवनाथ सुरेश देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले) याला देखील अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस उपनिरिक्षक बशीर तडवी, कर्मचारी शकील शेख, प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, महिला पोलीस छाया गायकवाड यांनी केली आहे.