शंभर वर्षांपासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला’


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने 1908 पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षांपूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील 8 जिल्हा परिषद शाळा आहेत. ‘संवत्सर’ व उर्वरित 8 जिल्हा परिषद शाळांनी 1908 पासून ते आजपर्यंत प्रवेश घेतलेल्या 15 हजार 174 विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटलरित्या जतन करून ठेवले आहेत. पुण्याच्या ‘ई-प्रशासन सॉफ्टवेअर’ या कंपनीच्या मदतीने ‘संवत्सर’ शाळेने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला आहे. ह्या उपक्रमाचे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. या उपक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शालिनी विखे-पाटील यांचे पाठबळ लाभले आहे. त्यांच्याच प्रयत्नांतून लोकसहभाग उपलब्ध झाला आहे. ‘संवत्सर’ शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांच्यासह इतर आठ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे विशेष योगदान लाभले आहे. संवत्सर गावातील शाळेत 6852, दशरथवाडी-2465, निरगुडेवस्ती 2008, परजणेवस्ती 1171, कोद्रेवस्ती 1410, बिरोबा चौक 520, औद्योगिक वसाहत 210, मनाईवस्ती 417 व वाघीनाला 112 असे एकूण 15 हजार 174 दाखल ऑनलाईन झाले आहेत.

डिजिटल दाखले मिळविताना शाळेतील एक क्रमांकाच्या रजिस्ट्ररमधील सर्व नोंदी स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्ये साठवल्या आहेत. त्यानुसार ज्या माजी विद्यार्थ्याला त्याचा दाखला हवा आहे. त्या व्यक्तीचे नाव, आडनाव अथवा शाळा सोडल्याचे वर्ष (माहित असल्यास) या तीनपैकी एक पर्याय टाकल्यास त्या नावाच्या व्यक्तींची नावे समोर येतात. ज्या नावाचा दखला हवा आहे. त्या नावावर क्लिक केल्यास काही क्षणात दाखला तयार होऊन त्याची प्रिंट काढता येते. तसेच दाखल्यातील नोंदी तपासवच्या असतील तर लगेचच रजिस्टरमधील पूर्वीच्या नोंदीचा फोटो समोर येतो. त्यातून दुरूस्ती देखील करता येते.

‘शाळा सोडल्याचा दाखला डिजिटलरित्या जतन करून ठेवण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. संवत्सर शाळेला नुकतीच भेट देऊन हा उपक्रम जाणून घेतला आहे. संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून जीर्ण अभिलेखे अतिशय अल्प खर्चात जतन करण्यात आले आहेत. यामुळे वेळ व श्रम दोन्हींची बचत होत आहे. जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही असा उपक्रम राबविता येणे शक्य आहे.’
– आशिष येरेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर)

Visits: 15 Today: 1 Total: 117333

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *