फसवणूक करणार्या वकील व पतसंस्थेवर कारवाई करा! व्यापार्याचे आयजींना साकडे; भरलेले कर्ज शिल्लक असल्याचे दाखविले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील एका कापड व्यापार्याने त्याला खरेदी करावयाच्या मिळकतीबाबत पूर्व इतिहास (सर्च रिपोर्ट) जाणून घेण्यासाठी शहरातील एका नामांकित वकिलांना सांगितले होते. त्यानुसार त्या वकिलांनी दिलेल्या अहवालावरुन संबंधित व्यापार्याने मूळ जागा मालकाच्या नावे असलेले 25 लाखांचे कर्ज फेडले, मात्र त्यानंतर दस्त नोंदविताना संबंधित जागामालकाने दीड वर्षांपूर्वीच सदरचे कर्ज भरल्याची बाब समोर आल्याने सदरील पतसंस्था व ‘त्या’ वकिलांनी संगनमत करुन आपली आर्थिक फसवणूक केल्याची जाणीव व्यापार्याला झाल्याने त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून तो वकिल आणि त्या पतसंस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी वेळोवळी पोलीस दप्तरी खेट्या मारल्या, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने त्या व्यापार्याने अखेर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणी लक्ष्य घालण्याची विनंती केली आहे.

याबाबत शहरातील पेटीट विद्यालयाजवळील कोहिनूर एन. एक्स. या कापड दालनाचे संचालक जतीन जोगिंदर बत्रा यांनी 21 जून रोजी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे लेखी कैफीयत सादर केली होती. त्यानुसार सदर व्यापार्याच्या दालनाशेजारीच असलेली श्याम सोमनाथ माळवे यांची विकावू मिळकत खरेदी करण्याच्या उद्देशाने त्यांनी शहरातील नामांकित विधीज्ञ श्रीराम गणपुले यांची भेट घेवून त्यांना सदर मिळकतीच्या पूर्वइतिहासाचा दाखला (सर्च रिपोर्ट) देण्याचे काम दिले होते. त्यानुसार अॅड. गणपुले यांनी सदर मिळकतीचा मागील 30 वर्षांचा पूर्वइतिहास तपासून 6 फेब्रुवारी 2020 रोजी तसा अहवाल देताना ‘त्या’ मिळकतीवर विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या 25 लाख रुपयांचा बोजा असल्याचे त्यांना लेखी स्वरुपात कळविले.

त्या अहवालावर भरवसा ठेवून जतीन बत्रा यांनी संबंधित पतसंस्थेतील शिल्लक असलेले 24 लाख 86 हजार 99 रुपयांचे कर्ज 20 फेब्रुवारी 2020 रोजी आपली आई, पत्नी व भावजयीच्या खात्यातून संबंधित मूळ जागा मालकाच्या खात्यात वर्ग केले व त्याच दिवशी त्यांनी सदरची मिळकत खरेदी करुन जागा मालकाकडून संगमनेरच्या दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात खरेदी खत केले. त्यानंतर 9 जून 2022 रोजी बत्रा यांना ‘त्या’ जागेचा दस्त दीड वर्षांपूर्वीच 5 जुलै 2018 रोजी नोंदविला गेला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्या दस्ताची नक्कत प्राप्त केली असता त्यांना धक्काच बसला. त्या दस्त नक्कलनुसार मूळ जागा मालक श्याम सोमनाथ माळवे यांनी विजय नागरी पतसंस्थेकडून घेतलेली संपूर्ण कर्जाची रक्कम 5 जुलै 2018 रोजी प्रत्यंतर पत्र नोंदणीकृत करुन फेडल्याचे समोर आले.

असे असतानाही संबंधित पतसंस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी जतीन बत्रा यांच्याकडून 24 लाख 86 हजार 99 रुपयांचा भरणा करवून घेतला. त्यामुळे त्या दोघांनाही आपणास अंधारात ठेवून आपली फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे विधीज्ञ श्रीराम गणपुले यांनी दिलेल्या सर्च रिपोर्टमध्ये 25 लाख रुपये भरणे बाकी असल्याचा स्पष्ट उल्लेख होता, मात्र नंतरच्या काळात कर्जदाराने दीड वर्षांपूर्वीच त्याची परतफेड केल्याचे समोर आल्याने सदरील पतसंस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांनी वकिलांशी संगनमत करुन आपली आर्थिक फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार जतीन बत्रा यांनी उपविभागीय अधिकार्यांकडे केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी आता पोलीस अधीक्षकांनंतर थेट नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेवून त्यांना या प्रकरणात लक्ष्य घालण्याची विनंती केली आहे.

