नराधम पित्याचा पोटच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार! आरोपीच्या आईने दिली फिर्याद; पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत केले जेरबंद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. शहराच्या पश्चिम कोपर्यात राहणार्या एका पंधरा वर्षीय मुलीवर वासनांध झालेल्या तिच्याच बापाने एकदा-दोनदा नव्हेतर तर तब्बल सहा महिने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ‘त्या’ नराधमाच्या जन्मदात्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन आरोपीला तत्काळ कारागृहात टाकले आहे. या वृत्ताने संगमनेरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहराच्या पश्चिमेकडील म्हाळुंगी नदीच्या परिसरातील लोकवस्तीत घडला आहे. या परिसरात एक 58 वर्षीय महिला आपला बेरोजगार मुलगा व त्याची 15 वर्षीय मुलगी आणि 13 वर्षीय मुलासोबत रहाते. त्या महिलेची सून दहा वर्षांपूर्वीच घर सोडून निघून गेलेली आहे. गेल्या सोमवारी (ता.10) दुपारच्या वेळी त्या महिलेची पंधरा वर्षीय नात पोटात दुखत असल्याने विव्हळत होती. त्यामुळे संबंधित महिलेने तिला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी करुन गोळ्या-औषधे दिल्यानंतर त्या दोघीही पुन्हा घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्या मुलीच्या आजीने ‘तुझ्या पोटात का दुखत आहे’ अशी विचारणा केली.

त्यावर ती लहानशी मुलगी रडू लागल्याने संशय बळावलेल्या तिच्या आजीने तिला मायेचा आधार देत बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेने सहा महिन्यांपूर्वी घरात कोणीही नसतांना आपल्याच जन्मदात्या बापाने आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे सांगितले. त्यांच्या या कृत्याला आपण विरोध केला असता त्यांनी आपणास मारहाण केल्याचे व त्यानंतर सदरचा प्रकार कोणास सांगितल्यास घरातून हुसकावून देण्याचा दमही भरल्याचे तिने सांगितला. आपला बाप आपल्याला घरातून हाकलून देईल या भितीने तो लहानशा जीव गप्प राहिल्याने त्याचा गैरफायदा घेत त्याने त्यानंतरही घरात कोणी नसल्याचा फायदा घेवून आपल्याच पोटच्या गोळ्यावर वेळोवेळी अत्याचार केले.

आपल्या पोटच्या मुलाने त्याच्या पोटच्या मुलीवर केलेला अत्याचाराचा हा संपूर्ण प्रकार ऐकूण संतप्त झालेल्या त्या माऊलीने आपल्या पंधरा वर्षांच्या नातीसह थेट शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या कानी घातला. त्यांनी तत्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत आरोपीला जेरबंदही केले. सदर पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्या नराधम पित्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 376 (2) (आय) (एफ) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उननिरीक्षक निकिता महाले यांच्याकडे सोपविला आहे.

