पठारभागात सोयाबीनचा पेरा वाढला; मात्र वरुणराजाने चिंता वाढवली गेल्या आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने हंगाम वाया जाण्याची शेतकर्यांना भीती
नायक वृत्तसेवा, घारगाव
निसर्गाच्या सान्निध्यात असूनही कायमच दुष्काळ सोसणार्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. विशेष म्हणजे जिरायती भाग असल्याने खरीप हंगामावरच येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे कायमच पारंपारिक पिकाप्रमाणे बाजरी पेरणार्या शेतकर्यांनी मागच्या वर्षापासून सोयाबीनमध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र, एकीकडे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडत असताना आणि कोविडचे संकट चालू असताना वरुणराजानेही शेतकर्यांना हुलकावणी दिल्याने सोयाबीनचा पेरा वाढूनही पीक हाती येईल की नाही, अशी चिंता सतावत आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या पठारभागाला चांगली वनसंपदा लाभलेली आहे. परंतु, कायमच दुष्काळ वाट्याला येतो. मध्यंतरी दोन-तीन वर्षे अतिवृष्टीने खरीपाची पिके अक्षरशः पाण्याने सडली. तर त्यानंतर कोविडचे संकट सुरू होवून बाजारभाव, महागाई आणि निसर्गाची अवकृपा अशी संकटे झेलत झेलत यंदाचा खरीप हंगाम तरी यशस्वीरित्या काढू या भाबड्या आशेवर येथील शेतकर्यांनी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढवला. सेंद्री कांद्याचे भरघोस उत्पादन घेणार्या नांदूर खंदरमाळ, बावपठार, मोरेवाडी या परिसरातील शेतकर्यांनी कांदा व बाजरी ऐवजी सोयाबीन पेरली.
मात्र, कधी कधी अतिवृष्टीचा तडाखा देणार्या वरुणराजाने गेल्या आठ दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पहायला लावली आहे. त्यामुळे सोयाबीनसह कांदा, बाजरी, वाटाणा आदी खरीप पिके धोक्यात आली आहे. आधीच कोरोना महामारीने शेतकर्यांचे आर्थिक गणित उलथवून टाकले असताना कर्जबाजारी होवूनही यंदा चांगले उत्पादन घेऊ अशी अपेक्षा ठेवत सोयाबीनचा पेरा वाढवला. मात्र, त्यावर पावसाने पाणी फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले असल्याची भावना नांदूर खंदरमाळ येथील शेतकरी गणेश सुपेकर यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला असून खाद्यतेलाचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशा स्थितीत खरीप हंगाम वाया जाऊन सोयाबीनचे उत्पादन झाले नाही तर पुन्हा खाद्यतेलाचे भाव वाढतील अशी शंकाही अनेक शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आकाशाकडे खिळलेल्या आहेत.
मागील वर्षी संगमनेर तालुक्यात साडेनऊ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदा तब्बल 13 हजार 400 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.
– प्रशांत शेंडे (तालुका कृषी अधिकारी, संगमनेर)