निराधार गौरवचे पोलीस होण्याचे स्वप्न होणार साकार आधारच्या माध्यमातून आर्य करिअर अकॅडेमीत प्रवेश


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एक वर्षाचा असताना वडील अपघातात वारले. अशाच संकटाच्या काळात दोन मुलांना वार्‍यावर सोडत आईने दुसरं लग्न करत नवा संसार थाटला. संगमनेरच्या पठारावरील साकूर येथील गौरवची संघर्षाची जगण्याची लढाई सुरू झाली. मात्र, त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याचे हे स्वप्न संगमनेरातील आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आर्य करिअर अकॅडेमीत प्रवेश मिळवून देत पूर्ण होणार आहे.

बालवयातचं गौरव पडेल ते शेतीकाम करायचा. कधी एखाद्या दुकानात मिळेल ते काम करुन दोन पैसे मिळवायचा आणि पोटाची खळगी भरायचा. कशीबशी दोन वेळेची भूक भागवत आजी व लहान बहिणीला जगविण्याचं काम केलं. गावातच दहावी-बारावी पास झाला. पुढे पोलीस बनण्याचं स्वप्न बाळगलं. त्यासाठी संगमनेर गाठलं. कुणीतरी निराधारांच्या शिक्षणासाठी काम करणार्‍या आधार संस्थेच नाव सूचवलं. आधारने परिस्थितीची खात्री करत पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. सामाजिक कार्यकर्ते अरुण इथापे यांचे मदतीने छोटे काम मिळाले. तेथेच राहण्या-जेवणाची सोय झाली.

त्यानंतर आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, लक्ष्मण कोते, डॉ. महादेव अरगडे यांनी आर्य करिअर अकॅडेमीचे अध्यक्ष सुनील फटांगरे यांना निराधार गौरवविषयी माहिती दिली. फक्त पाच हजार रुपये भरत़ तत्काळ त्याला प्रवेश दिला अन् गौरवला खूप आनंद झाला. यामुळे गौरवच्या पोलीस होण्यच्या स्वप्नांना आता बळ मिळाले आहे. याकामी समीर फटांगरे, विशाल रुपवते, बापू नरवडे यांंनी मदत केली.

Visits: 9 Today: 1 Total: 118912

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *