निळवंडेसाठी तुमचे योगदान काय? ः आ. थोरात तळेगाव दिघेत 25 कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्य पातळीवर सातत्याने मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीतून अविश्रांतपणे व प्रामाणिकपणे जनतेच्या विकासाची कामे केली. निळवंडे धरण व कालव्यासाठी अविरतपणे प्रयत्न केल्यानेच कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता निळवंड चे पाणी कोणीही थांबू शकणार नाही. निळवंडेसाठी ज्यांनी मदत केली आम्ही त्यांचा कायम उल्लेख करतो. मात्र तुमचे निळवंडेसाठी योगदान काय असा सवाल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विखे यांना विचारला असून समन्यायी पाणी वाटपाविरोधात संगमनेर व अकोले संघर्ष करत असताना तुम्ही या संघर्षात सहभाग न घेता का गप्प होता? असा परखड सवालही त्यांनी विचारला आहे.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे 25 कोटींच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे, शंकर खेमनर, बेबी थोरात, अमित पंडित, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, संपत डोंगरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, आपण कायम प्रामाणिक व मेहनतीने काम केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या राजकारणाचा राज्यात लौकिक आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून 171 गावे व 240 वाड्यांवर विकासाच्या योजना राबविल्या आहेत. 1999 ला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. अनेक अडचणी आल्या. परंतु यामध्ये माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मोलाचे सहकार्य केले. आज श्रेय घेऊ पाहणार्यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही. पुनर्वसितांना सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पदावर नोकर्या दिल्या. 2014 ते 2019 च्या काळात कामे अगदी मंदावली होती. ईश्वराच्या आशीर्वादाने पुन्हा सत्ता मिळाली आणि कालव्यांच्या कामाला खरी गती आली. हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ही कामे अंतिम टप्प्यात आहे. खरेतर या दिवाळीला पाणी या शिवारात आणायचे होते. परंतु सत्ता बदल झाला आणि कामे थंडावली. मात्र आपले पाणी कोणीही अडवू शकणार नाही.

संगमनेर बसस्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज रस्ता करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आपल्या संबंधातून केंद्राकडून 25 कोटी रुपये मिळाले व राज्य सरकारचे 25 कोटीतून हे काम सुरू आहे. मात्र काही मंडळींनी उद्घाटनाची घाई केली. उद्घाटने करायची असेल तर पहिला नगर-मनमाड रस्ता दुरुस्त करा. गचक्यांचा रस्ता म्हणून महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असल्याने त्या रस्त्याकडे पाहा. आम्ही कधीही वाईट राजकारण केले नाही, कुणाच्या अन्नात माती कालवली नाही किंवा कुणाबद्दल वाईटही चिंतले नाही. मात्र सध्याचे सुरू असलेले द्वेष भावनेचे राजकारण हे लोक पाहत आहेत हे विसरू नका, असेही माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले तर रमेश दिघे यांनी आभार मानले.
