दोन दिवसांत निर्णय न झाल्यास अधिकार्यांना कार्यालयात कोंडणार ः पिचड
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास अधिकार्यांना कार्यालयात कोंडणार ः पिचड
अकोले भाजपसह शेतकर्यांचे तहसील कार्यालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील शेतकर्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकार्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे. सडलेले, कुजलेले धान्य भेट देऊन मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती करुन त्याची पोहोच आम्हांला द्या, अशी अनोखी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी अकोले तहसील कार्यालयाच्या बाहेर बुधवारी (ता.28) जोरदार ठिय्या आंदोलन केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, सुरेश गभाले, रमेश राक्षे, सभापती उर्मिला राऊत, पंचायत समिती सदस्य माधवी जगधने, सीताबाई गोंदके, गोरख पथवे, राहुल देशमुख, हितेश कुंभार, सुशांत वाकचौरे, मच्छिंद्र चौधरी यांसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांपासून धान्य नाही आम्ही का पेंढा खायचा का? असा सवाल करून, शेतातील धान्य अवकाळी पावसाने सडून, कुजून गेले आहे. अद्याप पंचनामे नाहीत त्यामुळे बुधवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पाचनई, पेठेवाडी येथील ग्रामस्थ थेट तहसील कार्यालयावर माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली येऊन धडकले. जोपर्यंत पंचनामा करत नाही आणि रेशन दुकानदार निलंबित करून आम्हांला धन्य मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही असा निर्णय घेत सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केल्याने अधिकार्यांची एकच धावपळ उडाली.
यावेळी नायब तहसीलदार गिरी, पुरवठा अधिकारी रावते, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी याबाबत दोन दिवसांत पेठेवाडी येथे धान्य पाठवतो, पंचनामे केले जातील अशी लेखी हमी दिल्याने हे आंदोलन शांत झाले. पेठेवाडीचे सरपंच गोविंदा घोगरे यांनी सकाळीच सुमारे 50 महिला, मुले व ग्रामस्थांना घेऊन राजूर येथील माजी आमदार वैभव पिचड यांना भेटून आपली कैफियत मांडली. याची गांभीर्याने दखल घेत पिचड यांनी तातडीने सर्वांना सोबत घेऊन तहसील कार्यालय गाठले.
यावेळी सरपंच घोगरे व ग्रामस्थांनी गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 किलो तांदूळ सोडले तर काहीच धान्य मिळाले नाही. त्यात अस्मानी संकट आल्याने भातपीकही नष्ट झाले. शेतात गुडघाभर पाणी असून भात सडून-कुजून गेला आहे. हातात पेंढा सोडला तर काहीच नाही. रेशन दुकानदारही धान्य देत नाही मग आम्ही पेंढा खायचा का? असा संतप्त सवाल करत कुजलेले धान्य प्लास्टिक पिशवीत आणून ते तहसीलदार व कृषी अधिकार्यांना देऊन मुख्यमंत्र्यांना पाठवून त्याची भाकरी करून खा म्हणावे, म्हणजे आम्हा गरिबांना न्याय मिळेल अशी विनंती केली.
तर माजी आमदार पिचड यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी गावातील सुमारे 50 लोकांनी लेखी अर्ज देऊनही त्याची दखल घेतली नसल्याबाबत विचारणा केली. जुलैचा अर्ज 10 ऑक्टोबरला काढला व अजूनही जर तुम्ही रेशन देत नसेल तर त्या दुकानदाराचा परवाना रद्द करा व धान्य पोहोच करा. यावर नायब तहसीलदार गिरी यांनी तो अधिकार आम्हांला नाही जिल्हा पुरवठा अधिकार्यांना आहे असे म्हणताच वातावरण तापले. मग रतनवाडीचा परवाना आमदारांच्या सांगण्यावरुन निलंबित होतो, वांजुळशेतमध्ये डाळीचा गैरव्यवहार होऊनही आमदाराचा मामा म्हणून फक्त ठेव जप्त करता. एकाला एक न्याय व दुसर्याला दुसरा हे चालणार नाही. सायंकाळनंतर सरकारी रेशन वाहतूक बंद असताना ठेकेदार आमदाराचा कार्यकर्ता म्हणून रात्री बारा वाजता वाहतूक करतो याचे उत्तर द्या. तर नायब तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांना संपर्क साधून पिचड यांचे संभाषण करून दिले असता, सदर दुकानदार निलंबित करून पेठेवाडीला धान्य वाटप करतो अशी हमी दिल्याने वातावरण शांत झाले. तर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा, विमा प्रस्तावाची मुदत वाढवून द्या असे लेखी निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे व तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांना देण्यात आले. तसेच शेतात अवकाळीने सडलेले कुजलेले धान्य व ओंब्या नसलेले गवत देऊन ही भेट मुख्यमंत्र्यांना पाठवा आणि तशी पोहोच आम्हांला द्या अशी भाजप कार्यकर्ते व महिलांनी मागणी केली.