घारगाव पोलीस निरीक्षकांची संगमनेर शहरात ‘सर्जिकल स्ट्राइक’!. पोलीस अधीक्षकांचा आदेश; जुगार अड्ड्यावर इतिहासातील सर्वात मोठा छापा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी आज पहाटे संगमनेर शहरात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करीत इंदिरानगर परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी सव्वा लाखाच्या रोकडसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी एकूण 11 जणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून घारगावच्या पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली खरी पण, त्यांनी संगमनेरात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले उपलब्ध असताना त्यांच्यावर विश्वास का दाखवला नाही अशी कुजबूज आता सुरू झाली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याला अद्यापही स्थिर पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षा असल्याने शहरात सर्व काही आलबेल आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची वर्णी लावण्यात आली. खरेतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार मिळावा यासाठी जिल्हा पोलीस दलात होड लागलेली असते. पोलीस निरीक्षक भोसले यांना न मागता ती संधी प्राप्त झाली होती.
त्यांनी आपल्यातला अधिकारी जागवून शहरात आपल्या कामाची छाप निर्माण केली असती तर कदाचित त्यांच्या पदरात संगमनेर शहराचा कायम पदभार पडला असता. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. त्यांच्या येण्याने पूर्वस्थितीत बदल होण्याऐवजी शहरातील अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारवाया वाढल्या. आलेल्या संधीतून येथील गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवण्यात ते सपशेल अपयशी ठरले. हेच पोलीस अधीक्षकांनी त्यांना टाळून घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या करावी करवून घेतलेल्या या कारवाईतून सिद्ध होते.
संगमनेर शहराच्या गजबजलेल्या भागात चक्क हमरस्त्याच्या लगतच आलिशान इमारतीत सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर आज पहाटे घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी छापा घातला. संगमनेरच्या आजवरच्या इतिहासात सर्वात मोठी ठरेल अशा या कारवाईत पोलिसांनी सव्वा लाखाच्या रोकडसह तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करून त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज रविवारी (ता.02) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील जय जवान चौकात असलेल्या हॉटेल लकी शेजारील एका तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. या मजल्यावरील मोठ्या हॉलमध्ये चारही बाजूंना बिछायत करून मध्यभागी गुळगुळीत कागद ठेवून त्यावर तिरट नावाचा हार-जीतीचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
यावेळी सगळ्यांना आहे त्याच स्थितीत हात वरती करून बसल्यास सांगून पोलिसांनी या खेळात खेळण्यासाठी मध्यभागी कागदावर टाकलेल्या पैशांसह घटनास्थळी असलेल्या सर्वांच्या अंग झडतीतून एकूण एक लाख 21 हजार 500 रुपये रोख, 3 लाख रुपये किंमतीची मारुती स्विफ्ट (क्र.एम.एच 17/ए.झेड 0300), 60 हजार रुपये किंमतीची पल्सर मोटरसायकल (क्र.एम.एच. 17/बी.ई 6843), प्रत्येकी 30 हजार किंमत असलेल्या दोन पॅशन प्रो क्रमांक अनुक्रमे (एम.एच 17/ए.ए 5082) व (एम.एच 17/बी.एच 572) आणि एक 30 हजार रुपये किंमतीची कावासाकी मोटरसायकल (क्र.एम.एच 15/एक्स 4388) असा एकूण 5 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक यमुना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी 11 जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम 4 व 5 नुसार कारवाई करून त्यांची जामीनावर सुटका केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये आकाश गोडगे (वय 27) व गणेश धामणे (वय 37, दोघेही रा.इंदिरानगर), शुभम शिंदे (वय 27), सचिन मंडलिक (वय 30, रा.खांडगाव), प्रवीण जगदाळे (वय 30, रा. गोल्डन सिटी), निलेश काळे (वय 34, रा.कोल्हेवाडी रोड), रवींद्र म्हस्के (वय 36) व सनी पवार (वय 18, दोघेही रा. मालदाड रोड), प्रतीक जाजू (वय 28) व दीपक फटांगरे (वय 35, दोघेही रा.गणेश नगर), राहुल शिंदे (वय 24, रा.शिवाजीनगर) अशा एकूण 11 जणांवर वरील कायद्यान्वये कारवाई करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
Visits: 22 Today: 1 Total: 115008