संगमनेर शहराच्या रुग्णसंख्येत आजही झाली मोठी घट! मात्र शहरातील दोघांसह तालुक्यातील चौघांचा कोविडने घेतला बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दररोज उच्चांकी रुग्णसंख्या गाठणार्या अहमदनगर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळाला असून 15 एप्रिलनंतर पहिल्यांदाच सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या तीन हजारांहून खाली आली आहे. जिल्ह्यापाठोपाठ सोमवारी रुग्णसंख्येचा आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठणार्या संगमनेर तालुक्यालाही मोठी दिलासा मिळाला असून सोमवारच्या तुलनेत आज तालुक्यात अवघे 38 टक्के म्हणजे 148 रुग्ण समोर आले आहेत. त्यातही शहरातील रुग्णगतीला लागलेली ओहोटी आजही कायम असल्याने शहरवासियांसाठीही दिलासादायक स्थिती आहे. आज तालुक्यातील 148 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील अवघ्या 34 जणांचा समावेश आहे. दुर्दैवाने आज शहरातील दोघांसह तालुक्यातील चौघांचा बळीही गेला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 14 हजार 226 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. सध्या तालुक्यातील 1 हजार 830 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गेल्या 15 एप्रिलपासून जिल्ह्यासह तालुक्यातील रुग्णगतीत मोठी वाढ झाल्याचे दिसत असून दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण समोर येत राहील्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढण्यासह ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह अन्य औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र सोमवारनंतर आज सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या खालावल्याने जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एकीकडे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसंख्या तीन हजारांहून खाली आल्याने जिल्ह्यात दिलासा निर्माण झालेला असताना संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येने मात्र आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढतांना तब्बल 392 रुग्ण समोर आल्याने तालुक्यात भितीदायक वातावरण निर्माण झाले होते, मात्र कालच्या रुग्णवाढीला आज ब्रेक लागल्याने संगमनेर तालुक्यातही दिलासादायक वातावरण आहे.

जवळपास पंधरवड्यापासून संगमनेर तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत आहेत, तर तालुक्यातील अनेकांचे कोविडने बळी घेतल्याच्या दुर्दैवी वार्ताही दररोज कानावर येत आहेत. आजही संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरातील एका तरुणासह नाशिक रस्त्यावरील एका ज्येष्ठ नागरिकाचा व गुंजाळवाडी परिसरासह कौठे कमळेश्वर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोविडने बळी गेला आहे. कोणतीही लक्षणे जाणवताच ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन वारंवार शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र अनेकजण आजही घरगुती उपायांवर अथवा अन्य डॉक्टरांकडून साधे उपचार घेवून वेळ मारीत असल्यानेच कोविड संक्रमणातून मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकी जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या अवघ्या 14, खासगी प्रयोगशाळेच्या 77 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा 57 अशा एकूण 148 अहवलांमधून संगमनेर तालुक्यातील 148 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातून शहरीभागातील संक्रमणात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत असून आज एकूण रुग्णांपैकी शहरातील अवघ्या 34 जणांचा समावेश आहे. त्यामुळे वाढत्या संक्रमणातही संगमनेरकरांना काही प्रमाणात दिलासा प्राप्त झाला आहे. मात्र त्याचवेळी कोविड संक्रमणातून मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक असल्याने नागरिकांनी पूर्णतः सतर्क राहण्याची गरज वारंवार निर्माण होत आहे. सध्या संगमनेर तालुक्यात 1 हजार 830 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर तालुक्यातील विविध कोविड आरोग्य केंद्र व विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील रुग्णसंख्येतही आज सलग दुसर्या दिवशी मोठी घट झाली असून आज संपूर्ण जिल्ह्यातून 2 हजार 655 रुग्ण समोर आले आहेत. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 581, राहाता 301, नगर ग्रामीण 221, राहुरी 218, श्रीगोंदा 161, संगमनेर 148, श्रीरामपूर 144, अकोले 133, पारनेर 117, कोपरगाव 116, नेवासा 113, कर्जत 106, पाथर्डी 97, जामखेड 86, शेवगाव 71, इतर जिल्ह्यातील 24 व भिंगार लष्करी परिसरातील 18 रुग्णांचा समावेश आहे.

