स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घ्या!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घ्या!
भारतीय जनसंसदेची मागणी; मुख्यमंत्री व निवडणूक आयुक्तांना दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, नेवासा
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनसंसदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यांमध्ये सुमारे 28 हजार ग्रामपंचायती, 360 पंचायत समित्या, 34 जिल्हा परिषद, 22 महानगरपालिका सुमारे 360 नगरपरिषद व नगरपंचायत आहेत. यांच्या निवडणुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी महिना दोन-तीन महिन्यांनी होत असतात. त्यामुळे त्या शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात या संदर्भाने आचारसंहिता लागू होते व शासकीय कामकाज निर्णय प्रक्रियेसाठी पूर्ण ठप्प होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे आचारसंहितेच्या नावाखाली अनेक प्रशासकीय कामकाजाला टाळाटाळ करीत असतात. अनेकदा शासकीय अधिकारी, कर्मचारी हे त्या-त्या निवडणुकांच्या कामकाजासाठी निवडणूक आयोगाकडे हस्तांतरित होतात. त्यांच्यावर असलेली शासकीय कामकाजाची जबाबदारी, त्यांच्या टेबलावरील कामकाज पूर्ण ठप्प पडते. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची कामे ठप्प होत असतात. तसेच संपूर्ण पोलीस यंत्रणाही निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निर्णय जाहीर झाल्यानंतरही कायदा सुव्यवस्थेसाठी गुंतविली जाते. त्यामुळे पोलीस यंत्रणेकडे असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास व नागरिकांना संरक्षण व न्याय देण्याच्या कामांमध्ये मोठी कुचराई व दिरंगाई होते.
एकंदरीत सततची आचारसंहिता शासकीय कामकाजामध्ये मोठा अडसर ठरते. त्याचा शारीरिक, मानसिक व आर्थिक व सामाजिक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया लोकसभा-विधानसभा निवडणुकीप्रमाणे पाच वर्षांतून एकाचवेळी करण्यात यावी. त्याकरिता निवडणूक आयोगाच्या सोयीप्रमाणे एका महिन्यात अनेक टप्प्यात निवडणुका घेऊन निर्णय एकाच दिवशी जाहीर करावे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून धोरणात्मक निर्णयावर जनतेला एकाचवेळी निकोप लोकशाहीच्या उभारणीसाठी मत कर्तव्य बजावता येईल. एकाच वेळी निवडणुका घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदारसंघाबाहेरील कार्यकर्ते, लोक हे मतदारसंघ सोडून प्रचारासाठी, जमावाचा दबाव, दहशत करण्यासाठी जाणार नाहीत. राजकीय पक्षांतराची मोठी कीड व कार्यकर्त्यांची पळवापळवी समाजामध्ये लागली आहे.
निवडणुकीतील आर्थिक प्रलोभने, आश्वासने, अपप्रवृत्तींना काही प्रमाणात आळा बसेल. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण राज्यात एकाचवेळी घेण्याच्या दृष्टीने सध्या कोरोना महामारीच्या कारणाने संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा उपयोग करून विशेष कायदा करून राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनसंसदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन, प्रदेश सचिव प्रभाकर कोंढाळकर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अॅड.मोहन आडसूळ, पुणे शहराध्यक्ष नीलेश कांची, सातारा जिल्हाध्यक्ष संजय माने, जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, नंदूरबार जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, सरपंच ग्रामसंसद महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, आदर्श निर्मलचे सरपंच कैलास पटारे यांनी केली आहे.