लोकशाहिरांच्या पुतळ्यासमोरील बॅरिकेट्सला दुसरा रंग द्या!
लोकशाहिरांच्या पुतळ्यासमोरील बॅरिकेट्सला दुसरा रंग द्या!
कोपरगाव पोलीस बॉईज असोसिएशनची पालिकेकडे मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील मुख्य रस्त्यावर असणार्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर प्रशासनाच्यावतीने बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. या बॅरिकेट्सला काळा रंग असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसत नाही. यामुळे अपघात होत आहे. याची पोलीस बॉईज असोसिएशनने दखल घेत पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे बॅरिकेट्सला दुसरा रंग द्या अथवा रेडियम लावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.

कोपरगाव शहरातील मुख्य भागात लोकशाहिरांचा पुतळा आहे. येथे पालिका प्रशासनाने बॅरिकेट्स लावले आहेत. परंतु, दोन्ही बाजुंनी धावणार्या वाहनांना एकमेकांचा दिव्यांचा प्रकाश व्यवस्थित दिसत नसल्याने गोंधळ होऊन अपघात होतो. अनेकजण या बॅरिकेट्सला जाऊन धडकतात. यामध्ये अनेकांना गंभीर इजा होऊन अपंगत्व आले आहे. त्यामुळे पालिकेने याची गंभीर दखल घेऊन बॅरिकेट्सला दुसरा रंग द्यावा अथवा पिवळ्या किंवा लाल रंगाचे रेडियम लावावे अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे. या निवेदनावर बाळासाहेब साळुंके शहराध्यक्ष अनिल गाडे, शहर उपाध्यक्ष सोमनाथ अहिरे, तालुकाध्यक्ष दीपक आरणे यांच्या सह्या आहेत.

