विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले देण्याचा उपक्रम प्रेरणादायी ः गोसावी रामवाडी शाळेत दाखले वितरणासह मिष्टान्न भोजनाची मेजवाणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील रामवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच मिळवून देण्याचा उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पालक सहभागातून मिष्टान्न भोजन उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत आश्वी खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक गोसावी यांनी व्यक्त केले.

रामवाडी शाळेतील 21 विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण, मिष्टान्न भोजन व स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागातील पालकांसाठी जातीचे दाखले मिळवणे हे खूप किचकट काम असून शाळेचे मुख्याध्यापक केशव घुगे व उपाध्यापिका सुरेखा आंधळे यांच्या संकल्पनेतून आणि पालक दिलीप खरात व सागर खरात यांच्या सहकार्याने सदर दाखले विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. रामवाडी शिक्षकांच्या संकल्पनेतून पालकांच्या मदतीने राबवले जाणारे सर्व उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत केंद्रप्रमुख गोसावी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी घुगे यांनी शाळेतील विविध उपक्रम व विद्यार्थी प्रगतीबाबतची माहिती उपस्थितांना दिली. दाखले मिळवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल दिलीप खरात यांचा सत्कार करण्यात आला. शाळेत दर पंधरा दिवसाला सुरू असणारा पालक सहभागातून मिष्टान्न भोजन या उपक्रमांतर्गत भागवत नागरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेळ व केळी हे मिष्टान्न वाटप केले. दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भेळ बनवणे या उपक्रमांतर्गत कविता म्हणत कवितेत दिलेल्या सूचनांनुसार स्वतः भेळ बनविण्याचा अनुभव घेतला. याप्रसंगी मिष्टान्न भोजन दाते भागवत नागरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थी प्रणव संदीप खरात याने सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पालक दिलीप खरात व दीपक खरात यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षा रवीना खरात, सुनील खरात, योगिता खरात, स्वप्नाली भालेराव, प्राप्ती खरात, शीतल खरात, उत्कर्षा खरात, नंदा खरात, लता खरात, स्वाती खरात आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यापिका सुरेखा आंधळे व मुख्याध्यापक केशव घुगे यांनी परिश्रम घेतले.

Visits: 267 Today: 2 Total: 1593917

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *