आंबीखालसा फाटा येथे कारची बैलगाडीला धडक! दोघांसह दोन बैल जखमी; कार व बैलगाडीचेही नुकसान

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा (ता.संगमनेर) येथे कारची बैलगाडीला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघांसह दोन बैलही जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी (ता.21) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कार पुणे येथून आळेफाटा मार्गे नाशिकच्या दिशेने जात होती. शुक्रवारी दरम्यान, आंबीखालसा फाटा येथे ही कार आली असता त्याचवेळी ऊसतोड कामगार हे बैलगाडीतून आंबीखालसा येथे ऊस तोडीसाठी जात होते. यावेळी कारची बैलगाडीला जोराची धडक बसली आणि झालेल्या अपघातात बैलगाडीतील दोघे जखमी झाले आहे. यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे.

या अपघातात एक बैल गंभीर जखमी झाला, असून दुसरा बैलही जखमी आहे. हा अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनीही तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी जखमी झालेल्या बैलाला महामार्गावरून बाजूला घेतले. या अपघातात कारसह बैलगाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
