स्वर्गीय रंगुबाई गडगेंनी दुसर्‍यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला ः हभप. दीपक देशमुख प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गडगे परिवाराकडून श्री लक्ष्मी फाऊंडेशनची स्थापना

नायक वृत्तसेवा, घारगाव
जुन्या पिढीतील माणसांनी नेहमीच दुसर्‍यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. याचा प्रत्यय स्वर्गीय रंगुबाई सखाराम गडगे या माऊलीच्या जीवनकार्यातून दिसून आला, असे गौरवोद्गार हभप. दीपक महाराज देशमुख यांनी काढले.


संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन येथील स्वग. रंगुबाई गडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन सेवेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते अजय फटांगरे, तुळशीनाथ भोर, शिवाजी आहेर, आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, आंबीदुमालाचे सरपंच जालिंदर गागरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, लक्ष्मी ट्रेडींगचे संचालक बाळासाहेब गाडेकर, कांदा व्यापारी शिवप्रसाद गोळवा, कारखान्याचे संचालक पांडुरंग घुले, सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शांताराम गाडेकर आदी उपस्थित होते.

प्रवचनात पुढे बोलताना देशमुख महाराज म्हणाले, जुन्या माणसांकडे खूप मोठी विचारसरणी होती, त्यांचे विचार देखील मोठे होते. त्यामुळे जुनी माणसे ही आपल्यासाठी खरी आयडॉल आहेत. आज असंख्य गरजा वाढल्याने समाधान मिळत नाहीये. रंगुबाई आजींच्या सहवासात गडगे परिवाराची प्रगतीपथावर वाटचाल झाली. त्यामुळे जुन्या माणसांच्या संस्कारांवर व विचारांवर वाटचाल केली तर नक्कीच समाधानी आयुष्य जगू शकतो, असा सल्ला दिला. या प्रवचनात रंगुबाई आजींच्या यशस्वी व समाधानी जीवनाचे विविध पैलू महाराजांनी ठळकपणे विशद केले. याचबरोबर अनेक प्रसंग कथन केल्याने श्रोतेही मंत्रमुग्ध होवून ऐकत होते.

प्रवचनाची सांगता झाल्यावर उपस्थित मान्यवरांनी आजींना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर गडगे परिवाराच्या वाटचालीवर देखील प्रकाश टाकला. शेवटी स्वर्गीय सखाराम धोंडिबा गडगे, भामबाई सखाराम गडगे व रंगुबाई सखाराम गडगे यांच्या स्मरणार्थ भा.स.रं.ग. संचलित श्री लक्ष्मी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याकामी दत्तात्रय गडगे, ज्ञानदेव गडगे, सुनील गडगे, राहुल गडगे, स्वप्नील गडगे, करण गडगे, भूषण गडगे आदिंनी पुढाकार घेतला.

Visits: 132 Today: 1 Total: 1099760

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *