सैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना अभिमानास्पद ः थोरात
सैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना अभिमानास्पद ः थोरात
जयहिंदच्या महिलांकडून दीपावलीनिमित्त सैनिकांना फराळाचे वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशवासियांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस सीमेवर पहारा देत असलेल्या तालुक्यातील भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांना जयहिंद महिला मंचच्या भगिनींकडून दीपावलीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले असून ही सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना अभिमानास्पद असल्याचे गौरोवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेरातील यशोधन संपर्क कार्यालयात जयहिंद महिला मंच व स्वराज्य सैनिक कल्याण संस्था यांच्यावतीने तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबियांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, निवृत्त सैनिक रावसाहेब कोटकर, प्रकाश कोटकर, वीरमाता अलका रहाणे, वीरपत्नी शारदा थोरात, वीरपत्नी सुनीता निघुते, संदीप उर्किडे, सुरेश थोरात, मधुकर गुंजाळ, सुनीता कांदळकर, सुनीता अभंग, निर्मला गुंजाळ, प्रा.बाबा खरात, अॅड.नानासाहेब शिंदे, भानुदास पोखरकर, सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रवीण गुंजाळ, अर्जुन कोल्हे, आनंदा गिते, संतोष आहेर, भारत कुटे, बाळासाहेब आंधळे, रोहिणी कोटकर, प्रकाश काशिद, विक्रम थोरात, अर्चना बालोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना थोरात म्हणाले, भारतीय सैनिक हे प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे. शेतकरी व सैनिक हे देशाच्या प्रगतीत अत्यंत महत्वाचे आहे. तालुक्यातील महिलांनी तुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा आदर करुन त्यांना गोड फराळाचे केलेले वाटप हा भावनिक व सर्वांना मार्गदर्शक उपक्रम ठरला आहे. संगमनेर तालुक्याने कायम राज्याला दिशादर्शक विचार दिले असून पुरोगामी व समतेचा विचार जोपासत अनेक उपक्रम संगमनेरमध्ये राबवले जात आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, वैभवशाली शहर ठरलेल्या संगमनेर तालुक्यातून दीपावलीनिमित्त भारतीय सैनिकांना सीमेवर फराळ पाठविण्याचा अभिवन उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासून हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दीपावली हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात. रात्रं-दिवस ऊन, वारा, पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना तालुक्यातील बचत गट, महिला मंडळ यांच्याकडून विविध फराळाचे पदार्थ उच्च प्रतिच्या पॅकिंगमध्ये त्यांच्या कुटुंबियांना दिले आहेत. यावेळी निवृत्त सैनिक रावसाहेब कोटकर, प्रकाश कोटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला, कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.