चाकूचा धाक दाखवून लूट करणार्‍या टोळीच्या आवळल्या मुसक्या 2 लाख 78 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाची कामगिरी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर परिसरात व ग्रामीण भागात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या टोळीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत त्यांच्याकडून 2 लाख 78 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

गुन्हेगारांची माहिती काढून कारवाईबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोना. अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोकॉ. अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांचे पथक तयार करुन त्यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निंबाळे चौफुली येथे धनंजय बाबासाहेब वर्पे (रा. रहिमपूर) यांना अडवून दोन मोबाईल व रोख रक्कम काढून घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकारेच प्रभाकर चंदू आव्हाड (रा. वाघापूर) यांनाही अडवून मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली होती. पोखरी हवेलीजवळ सागर विठ्ठल काळे (रा. पारेगाव खुर्द) यांनाही मारहाण करुन मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्र चोरले होते. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

तयसेच जांभुळवाडी फाट्याजवळ अमोल गवराम कोटकर (रा. पिंपळे) हे टेंपो लावून त्यात झोपलेले असता या तिघांनी मारहाण करुन मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे घेवून पोबारा केला आहे. याबाबतही तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. शहरातील अकोले नाका येथे आदिनाथ तुकाराम मोरे (रा. अंभोरे) हे मित्रांसोबत थांबलेले असताना त्यांचा मोबाईल व रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांचा तपास करुन कलीम अकबर पठाण (वय 20), सलीम अकबर पठाण (वय 22, दोन्ही रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) आणि जुनेद यूनुस शेख (वय 23 वर्षे, रा.जमजम कॉलनी, संगमनेर) यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल, चाकू, चोरीस गेलेले मोबाईल व रोख रक्कम 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे हे करत आहे.


उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने मुसक्या आवळलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर संगमनेर शहर, तालुका व शिर्डी पोलिसांत डझनभर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून आता कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *