आंबीखालसा ते कोठे खुर्द रस्त्याच्या कडेला पडले मोठे भगदाड अपघातांना देतेय निमंत्रण; संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा ते कोठे खुर्द या डांबरी रस्त्यालगत असलेल्या तांगडी येथील चौतवाडी वस्तीजवळ नदीकाठच्या बाजूने रस्त्यालगत मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, संबंधित विभागाला तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

आंबीखालसा ते कोठे खुर्द हा रस्ता पुढे अकोले तालुक्यात जातो. त्यामुळे या रस्त्यावरून रात्रंदिवस छोट्या-मोठ्या वाहनांसह स्कूल बस देखील ये-जा करतात. तांगडी गावच्याच पुढे चौतवाडी वस्तीजवळ नदीकाठच्या बाजूने डांबरी रस्त्याच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे येथून एकावेळी दोन वाहने क्रॉस होताना मोठी अडचण निर्माण होत आहे. थोडे बाजूला वाहन घेतले तरी लगेचच पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी तर हे भगदाड वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने कधीही दुर्घटना घडू शकते.

त्यासाठी संबंधित विभागाने दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे या भगदाडाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवतही वाढले असल्याने वाहनचालकांच्या निदर्शनास येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याबाबत संबंधित विभागाला वारंवार निवेदन-अर्ज देवूनही दुर्लक्ष करत असल्याने एखाद्याचा जीव घेतल्यावरच लक्ष देणार का? असा संतप्त सवाल आंबी-माळेगाव सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कान्होरे, ज्ञानेश्वर गडगे, बबन गाडेकर, सुधीर गाडेकर, सखाहारी तांगडकर, दिनकर तांगडकर, आनंथा गडगे, अर्जुन गाडेकर, संपत गडगे, सुयोग गडगे, अरूण तांगडकर आदिंनी विचारला आहे.

आंबीखालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर तांगडी येथील चौतवाडी वस्तीजवळ नदीकाठच्या बाजूने डांबरी रस्ता खचला असून मोठे भगदाड पडले आहे. यापूर्वी येथे अपघातही झाला आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने भगदाडाच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अपघात होण्यापूर्वीच येथे भिंत बांधावी.
– सुरेश कान्होरे (अध्यक्ष-आंबी-माळेगाव सोसायटी)

Visits: 8 Today: 1 Total: 118509

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *