नगर-शिर्डी महामार्गाचे रखडलेले काम विद्यार्थ्यांसाठी ठरतेय धोकादायक! रस्त्यालगतची गटार अर्धवट स्थितीत; उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोल्हार येथील नगर-शिर्डी महामार्गाचे रखडलेले काम विद्यार्थी व नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्यालगतच्या विशेषतः गावांमधील सर्वच शाळांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरला आहे.
![]()
कोल्हार (ता. राहाता) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील एका शिक्षिकेचा रस्त्यालगतच्या चरात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. मात्र, अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कोणतीही उपाययोजना अद्यापही केलेली दिसत नाही. शाळेचे शेकडो विद्यार्थी येथून ये-जा करतात. त्यांच्यावर एखादा दुर्दैवी प्रसंग ओढवून त्यांचा बळी गेल्यावरच संबंधितांना जाग घेणार का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

रयतच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील उपशिक्षिका उषा शेंडे यांचा चरात पडून जागीच मृत्यू झाला. या घटनेला आता महिना होईल. मात्र, त्या धोकादायक खड्ड्याची स्थिती जशीच्या तशी आहे. पंधरा दिवसापांसून शाळा नियमित सुरू झाली आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांची शाळेत ये-जा सुरू झाली आहे. शाळेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारास लागून रस्त्यालगत गटार आहे. मात्र, काही वर्षांपासून ते दुर्लक्षित व दुरावस्थेत आहे. रस्त्याची कामे सुरू झाल्यावर साइड गटारांचीही कामे पूर्ण होतील, असे वाटले होते. प्रत्यक्षात ठेकेदाराने कामाकडे पाठ फिरविली. रस्त्याचे काम बंद पडले. त्यामुळे रस्त्यासंबंधीची कोणतीही कामे होतील याची आता शाश्वती राहिलेली नाही. अशावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान धोकादायक ठिकाणी कठडे बांधावेत, तसेच अपघात घडणार नाहीत यादृष्टीने खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

नगर-शिर्डी रस्त्यालगतचे पूर्वीचे तयार केलेले गावातील आरसीसी गटार अर्धवट स्थितीतच आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची तोंडे मोकळी केलेली नाहीत. साइड गटार फक्त तीन फूट खोल आहे. त्याला उतार नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात नाही. जागेवरच तुंबते, गटारात कचरा साचतो. तसेच काही ठिकाणचे चर नुसतेच खोदून ठेवले आहेत. रोगापेक्षाही औषध भयंकर, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
– अॅड. सुरेंद्र खर्डे (माजी सरपंच-कोल्हार बुद्रुक)
