वाळू उपशाविरोधात आरपीआयचे शनिवारी उपोषण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिलेली आहे. परंतु, शासन नियमांकडे सर्रासपणे डोळेझाक करुन संबंधित ठेकेदार बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शनिवारी (ता.3) प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकार्‍यांनी कोल्हेवाडी शिवारातील प्रवरा नदी पात्रालगत एक हजार ब्रास वाळू उपशास परवानगी दिलेली आहे. परंतु, संबंधित ठेकेदार सर्रासपणे शासन नियमांकडे दुर्लक्ष करुन वाळू उपसा करत आहे. तसेच निश्चित क्षेत्राला सोडून इतर क्षेत्रातून बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहे. याचबरोबर तालुका व तालुक्याबाहेर चढ्या दराने वाळूची विक्री होत आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तरी देखील प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित क्षेत्राचा पंचनामा करुन दंडात्मक व कायदेशीर कारवाई करुन वाळू उपसा थांबवावा अशी मागणी आरपीआयने केली आहे. अन्यथा शनिवारी प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, युवकाध्यक्ष योगेश मुन्तोडे, राज्य नेते अशोक खरात, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष आशिष शेळके आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 104 Today: 2 Total: 1104330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *