आदिवासी लहान मुलांची वेठबिगारीसाठी विक्री करणार्या पाचजणांवर गुन्हा दाखल! सहा मुलांची सुटका; संगमनेर तालुक्यातील एकासह पारनेर तालुक्यातील चार आरोपींचा समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुर्गम भागात राहणार्या गरीब आदिवासी कुटुंबातील लहान मुलांना हेरुन त्यांच्या पालकांना पैशांचे आमिष दाखवून ‘त्या’ मुलांची विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात उघड झाले आहे. वेठबिगारीसाठी संगमनेर तालुक्यात आणलेल्या एका दहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली असून अशा पद्धतीने काम करणार्या दलालांचे जिल्ह्यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी नाशिकच्या सामाजिक संस्थेच्या मदतीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वेठबिगार पद्धती उच्चाटन अधिनियमातंर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका प्रकरणातील पाच मुलांची पारनेर तालुक्यात विक्री करण्यात आली होती व त्यातील चारही आरोपी पळशीचे असल्याने सदरचा गुन्हा पारनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरात राहणार्या एका दहावर्षीय लहान मुलीस संबंधित मेंढपाळाने मारहाण करुन जखमी अवस्थेत तिच्या आई-वडीलांच्या झोपडी समोर आणून टाकले होते. 27 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणाचा तपास संगमनेर तालुका पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर खर्याअर्थी या प्रकरणाला वाचा फुटून नाशिक जिल्ह्यातील घोटी व इगतपुरी येथील दुर्गम भागात राहणार्या गरीब आदिवासी मुलांना हेरुन त्यांच्या आई-वडीलांना काही पैशांचे आमिष दाखवले जाते व त्या लहान मुलांना संगमनेर व पारनेर तालुक्यातील मेंढपाळांना विकून त्यांच्याकडून वेठबिगारीचे कामे करवून घेतली जातात हे समोर आले.

घोटीतील मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नाशिकमधील श्रमजीवी संघटनेच्या सुनील वाघ व संजय शिंदे या दोघा पदाधिकार्यांसह इगतपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन पीडित मुलाच्या वडिलांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तत्पूर्वी संगमनेर तालुका दंडाधिकार्यांनी या प्रकरणातील एका मुलासह दुसर्या प्रकरणातील पाच मुलांचे जवाब नोंदवून मुक्त वेठबिगार असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर यातील पहिल्या प्रकरणात तालुक्यातील डिग्रस येथील प्रकाश पुणेकर या मेंढपाळावर वेठबिगार पद्धती उच्चाटन अधिनियमाच्या कलम 16, 17, 18 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारातील दुसरा गुन्हाही तालुका पोलिसांनी नोंदवून घेतला असून तो पारनेर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात पारनेर तालुक्यातील रामदास लव्हारे व रामा पोकळे (दोघेही रा.पळशी, ता.पारनेर), रावा खताळ (रा.ढवळपुरी, ता.पारनेर) व कांतीलाल कारंडे (रा.वनकुटे, ता.पारनेर) या चौघांवर वरील अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी घोटी व इगतपुरी परिसरातील बारावर्षीय एक, तेरावर्षीय दोन व पंधरावर्षीय मुलांसह एका तेरावर्षीय मुलीकडून वेठबिगारी केल्याचे समोर आले आहे. या सहाही मुलांची तालुका पोलिसांनी सुटका केली असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आदिवासी गरीब कुटुंबे हेरुन जिल्ह्यातील काही दलाल पालकांना काही पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेठबिगारी करण्यासाठी लहान मुले विकत घेत व नंतर ती संगमनेर व पारनेर तालुक्यातील मेंढपाळांना विकली जात. सदर मुलांना वेठबिगार म्हणून खरेदी करणारा मेंढपाळ त्या मुलांना अतिशय वाईट वागणूक देत. यातील डिग्रस येथील प्रकाश पुणेकर या मेंढपाळा विरोधातील तक्रारीत या अमानुषतेचा स्पष्ट उल्लेख असून सदरील मेंढपाळ त्याच्या ताब्यात असलेल्या मुलाकडून दोनवेळच्या जेवणावर वर्षभर त्या मुलाकडून काबाडकष्ट करुन घेत होता व त्या बदल्यात दिवाळीला एक जोडी कपडे व एक सँडलच्या जोडसह केवळ पाच-दहा रुपये देत असल्याचा जवाब खुद्द पीडित मुलाने तालुका दंडाधिकार्यांसमोर नोंदविला आहे.

संगमनेर व पारनेर तालुक्यात मेंढपाळांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातून अजूनही असे प्रकार समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनीही मानवतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील अशा दलालांचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्याची गरज यातून निर्माण झाली आहे. एकीकडे आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे पुढारलेपणाचा आव आणणार्या संगमनेर तालुक्यात असेप्रकार अत्यंत धक्कादायक आणि शरमेने मान खाली घालायला लावणारे असून या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे उपटण्याची गरज निर्माण झाली आहे.

