ढोकरी येथे कोरोना विधवेशी दीराने केला विवाह कोरोना एकल पुनर्वसन समितीकडून महिलेचा पतीसह सत्कार
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोनात विधवा झालेली 24 वर्षांची तरुण विधवा महिला व तिचा दीर यांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक आदर्श घालून दिल्याबद्दल कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.
अकोले तालुक्यातील ढोकरी येथील नीलेश शेटे यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांचे लग्न 4 वर्षांपूर्वी झाले होते व त्यांना 3 वर्षांची एक मुलगीही आहे. त्यांची तरुण पत्नी पूनम अवघी 24 वर्षांची आहे व नीलेशचा भाऊ समाधान हाही विवाहयोग्य वयाचा असल्याने त्या गावातील ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते माधव तिटमे यांनी यात पुढाकार घेतला. दोन्ही कुटुंबांशी व समाधान-पूनम यांच्याशी अनेक वेळा चर्चा केल्या. गावातील नागरिकांनाही त्यात सहभागी करून घेतले व सर्वांच्या पुढाकाराने समाधान व पूनम यांनी विवाहाचा निर्णय घेतला. नुकताच त्यांचा विवाह म्हाळादेवी येथे येथे संपन्न झाला. दरम्यान, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती विधवा महिलांसाठी गेली अनेक महिने काम करत आहे. त्यामुळे या अनुकरणीय निर्णयाचे कौतुक करण्यासाठी समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी ढोकरी येथे जाऊन त्या कुटुंबाचा व नवदाम्पत्याचा सत्कार केला. या छोटेखानी समारंभात माधव तिटमे यांनी त्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगून या विवाहाचा घटनाक्रम सांगितला व समाजात त्याचे अनुकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी सरपंच विकास शेटे व दत्तू शेटे यांनीही या घटनेबद्दल आनंद व्यक्त करून सामाजिक प्रबोधनासाठी घडलेली ही अत्यंत महत्त्वाची कृती असल्याचे सांगितले. संगीता साळवे यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन केले. पत्रकार हेमंत आवारी यांनी महाराष्ट्रातील पुनर्विवाहाची मंदावलेली चळवळ पुन्हा गतिमान करणारी ही घटना असल्याचे सांगितले.
यावेळी पूनम व समाधान यांना साडीचोळी, शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गावाच्या साक्षीने ललित छल्लारे व संगीता साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावच्या पाटील घराण्यातील वृद्ध व्यक्तींनी या नव्या विचाराला स्वीकारून संमती दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रावसाहेब नवले यांनी केले. याप्रसंगी कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी, कार्यकर्ते ललीत छल्लारे, भाऊसाहेब वाकचौरे, मनोज गायकवाड, संगीता साळवे, प्रशांत धुमाळ, प्रतिमा कुलकर्णी, वसंत आहेर, विठ्ठल शेटे, मीना कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत तरुणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याने तरुण विधवांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आपल्या समाजात पुरुष सहजपणे दुसरे लग्न करू शकतो. परंतु तरुण स्त्रीला जातीची, समाजाची, घराण्याच्या परंपरेची, मुले असण्याची कारणे देऊन असा निर्णय घेण्यापासून रोखले जाते. त्यामुळे ही घटना या सामाजिक बंधनांना झुगारून देणारी महत्त्वपूर्ण घटना आहे म्हणून तिचे स्वागत केले पाहिजे. समाजातील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील असा विवाह करू इच्छिणार्या महिलांच्या पाठिशी उभे राहावे.
– हेरंब कुलकर्णी (राज्य निमंत्रक – कोरोना एकल पुनर्वसन समिती)