नागपूर ते शिर्डी मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण
नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोना काळात मंदावलेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला अखेर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वेग देण्यात आला आहे. 701 किमी लांबीच्या या प्रकल्पातील 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर यातील 520 किमीच्या नागपूर ते शिर्डी मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नोव्हेंबपर्यंत पूर्ण करत 520 किमीचा हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे.
मुंबई ते नागपूर रस्ते प्रवास वेगवान करण्यासाठी समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली असून या मार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. मात्र त्याचवेळी या प्रकल्पाच्या पूर्णत्वास विलंब होताना दिसत आहे. सुरुवातीला जमीन संपादन आणि शेतकरी-स्थानिकांच्या विरोधामुळे प्रकल्प संथ गतीने पुढे जात होता. तर या अडचणी दूर झाल्यानंतर प्रकल्प वेग घेत असतानाच मार्च 2020 मध्ये देशात करोनाचा शिरकाव झाला. याचा फटका पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांनाही बसला. पहिल्या लाटेत परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेल्याने समृद्धी महामार्गात काम करणार्या मजुरांची संख्या घटली. याचा परिणाम कामावर झाला. त्यामुळेच नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा डिसेंबर 2020 मध्ये सुरू होऊ शकला असता तो अजून पूर्ण झालेला नाही. गेल्या वर्षी पहिली लाट ओसरल्यानंतर दिवाळीपासून मजुरांची संख्या वाढली आणि कामाचा वेग ही वाढला. त्यामुळे एमएसआरडीसीने 1 मे, 2021 चा मुहूर्त पहिल्या टप्प्यासाठी जाहीर केला. पण मार्च 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि याचा पुन्हा एकदा फटका प्रकल्पाला बसला. त्यामुळे 1 मे, 2021 चा ही मुहूर्त चुकला. पण आता मात्र नोव्हेंबर अखेपर्यंत काम पूर्ण करत डिसेंबपर्यंत पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने कामाला वेग देण्यात आला आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत पहिल्या टप्प्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 520 किमीपैकी 450 किमीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे, तर दुसरीकडे आता लवकरच मार्गावरील सोयी-सुविधा विकसित करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. एकूणच पहिल्या टप्प्यातील 100 टक्के काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि 520 किमीचा मार्ग डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल होईल अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे.