‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना काळाची गरज ः बी. जी. शेखर गणेश मंडळांनी समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करुन समाज प्रबोधन करावे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेशोत्सव म्हणजे भारतीय संस्कृती आहे. आपल्या पूर्वजांनी सांस्कृतिक परंपरेची मांडणी अशा पद्धतीने केली आहे की ती विविध सण व उत्सवांद्वारे साजरी केली जाते. अशा उत्सवांच्या माध्यमातून मंडळांनी समाजाला उपयोगी ठरतील, त्यातून समाजाचे प्रबोधन होईल अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. जेव्हा अशा प्रकारचा उत्सव साजरा होईल तेव्हा खर्याअर्थी या उत्सवांना सार्वजनिक स्वरुप देण्याचा हेतू साध्य होईल असे मत नाशिक विभागाचे विशेष पोली महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी व्यक्त केले.
संगमनेरातील गणेशोत्सव व त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नाशिककडे जाताना थांबले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. या उत्सवांच्या कालावधीत गणेश मंडळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यातून लहान मुले, महिला व तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सव्वाशे वर्षांपूर्वी या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप देतांना आपल्या पूर्वजांनी हाच हेतू समोर ठेवला होता. त्या परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप लक्षात घेता ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेचे व्यापक रुप समोर येण्याची आवश्यकता आहे. संगमनेर तालुका पुरोगामी आदी सुधारणावादी विचारांचा आहे. त्यामुळे ही संकल्पना तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबविली जात असून दिवसोंदिवस त्याचा प्रतिसादही वाढत असल्याचे सांगतांना शेखर पुढे म्हणाले की, एकाच गल्लीत अथवा परिसरात चार-चार मंडळे स्थापन करुन त्याद्वारे अनावश्यक खर्च करण्याची स्पर्धा लागली आहे. सदृढ समाज निर्मितीसाठी ती नक्कीच पोषक ठरणार नाही. त्याऐवजी शहरीभागात एका परिसरात एकच मंडळ स्थापन करुन त्याद्वारे समाजाला केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम आयोजित केल्यास या उत्सवांचा हेतू सफल होईल.
आज तरुणाईला सोशल माध्यमाच्या कचाट्यात सापडल्याचे सांगताना त्यांनी खात्री न करता चुकीचे संदेश आले तसेच पुढे पाठविल्याने अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. एखाद्याकडून अनावधानाने जरी असा प्रकार घडला तरीही त्यातून समाजात उमटलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा तरुणांसाठी शासकीय नोकर्यांची कवाडे कायमस्वरुपी बंद होतात याचा तरुणांनी गांभीर्याने विचार करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाशिक विभागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांमध्ये व्यावसायिकता रुजविण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून सुरु आहे. पोलिसांनी सांघिक भावना ठेवून काम केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम समोर येतील अशी आपणास अपेक्षा असल्याने त्यादृष्टीनेही आमचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही अधिक सजग राहून आपण देशाचा जबाबदार घटक असल्याची सतत जाणीव ठेवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.