सावधान! जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचा आलेख पुन्हा उंचावतोय जिल्ह्याने गाठली पुन्हा सरासरी; निष्काळजीपणामुळे वाढू शकते रुग्णांची संख्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वी जगभरात पोहोचलेल्या कोविडने आजवर कोट्यवधी नागरिकांना संक्रमित करीत लाखों नागरिकांचा बळीही घेतला. आपल्या देशातही गेल्या मार्चपर्यंत कोविडचा प्रभाव कायम होता. मात्र एप्रिलपासून देशभरातील कोविड बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली. या कालावधीत बाधित होवून उपचारांती ठीकठाक झालेल्यांच्या शरीरात निर्माण झालेली प्रतिपिंडे आणि केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे रुग्णसंख्या खाली आली. त्यामुळे देशभरातील कोविड निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे कोविड गेला असे समजून नागरिकही त्याबाबत निष्काळजीपणाने वागू लागले. त्याचा परिणाम आता पुन्हा एकदा दिसू लागला असून जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत चिंताजनक पद्धतीने वाढ होवू लागली आहे. त्यात सध्याच्या वातावरणाचीही भर पडल्याने गेल्या चार दिवसांतच जिल्ह्यात दोनशे रुग्णांची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत आजवर जिल्ह्यात 3 लाख 95 हजार 653 रुग्ण आढळले असून 7 हजार 228 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 292 आहे.

संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत अनेकांना बाधित करणार्या आणि त्यांचा बळी घेणार्या कोविड संक्रमणाने चालू
वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. जानेवारीत तर संक्रमणाने उच्चांक गाठतांना जिल्ह्यातील तब्बल 23 हजार 953 रुग्णांना बाधित केले, तर फेब्रुवारीत त्यात निम्म्याने घट होवून संपूर्ण जिल्ह्यातून 10 हजार 957 बाधित रुग्ण समोर आले. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटून मे महिन्यात ती अगदी सरासरी 2.29 रुग्ण प्रतिदिन या गतीने 71 रुग्णांवर आली. त्यामुळे कोविडच्या अनुषंगाने लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील अन्य जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग खाली असतांनाही अहमदनगर जिल्ह्यातील संक्रमणाची गती मात्र कायम होती. मात्र लागोपाठ दोन वर्ष निर्बंधात राहिल्याने नागरीकांच्या सहनशीलतेचा उद्रेक नको म्हणून देशातील दहा संक्रमित जिल्ह्यात समावेश असूनही लसीकरणाच्या आकडेवारीवरुन जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले.

या कालावधीत मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांसह विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन झाले, मात्र संक्रमणाची खालावलेली स्थिती कायम राहिल्याने सलग दोन वर्ष नागरी मनात दहशत निर्माण करणार्या कोविडबाबत
सर्वसामान्यांच्या मनातील भीती नाहीशी झाली. जूनपासून पावसाळा सुरु झाल्याने वातावरणातील बदलांचा परिणामही जाणवू लागला. त्यातच सर्दी, पडसे व खोकल्याची साथ सुरु झाल्याने दवाखाने रुग्णांच्या गर्दीने ओसंडू लागली. याच वातावरणाचा परिणाम गेला.. गेला.. असं समजल्या जाणार्या कोविडसाठीही पोषक असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतराचेही पालन करावे असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले गेले. मात्र त्याकडे कोणीही गांभीर्याने पहायला तयार नसल्याने त्याचे दुष्परिणाम आता समोर येवू लागले असून जूनच्या संपूर्ण महिन्यात जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या दुप्पट रुग्ण जुलैच्या पहिल्या 13 दिवसांतच समोर आले आहेत.

गेल्या 1 जुलैपासून जिल्ह्याच्या दैनंदिन सरासरी रुग्णांच्या संख्येतही चिंताजनक वाढ झाली असून आजच्या स्थितीत जिल्ह्यात
दररोज 36.53 रुग्ण समोर येत आहेत. गेल्या अवघ्या 13 दिवसांतच जिल्ह्यात 475 रुग्ण आढळले असून ही संख्या जूनमधील (242 रुग्ण) एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास दुप्पट आहे. अहमदनगर महापालिका क्षेत्रात रुग्णवाढीचा वेग अधिक असून तेथून दररोज सरासरी 9 रुग्ण समोर येत आहेत. त्या खालोखाल श्रीरामपूर (41 रुग्ण), राहाता व नगर तालुका (प्रत्येकी 39 रुग्ण), शेवगाव (38 रुग्ण) व संगमनेर (34 रुग्ण) अशी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची स्थिती आहे. राहुरी, पारनेर, पाथर्डी व श्रीगोंदा येथील रुग्णसंख्या संगमनेरपेक्षा निम्मी असून कोपरगाव, नेवासा, अकोले, कर्जत व जामखेड तालुक्यात चालू महिन्यात आत्तापर्यंत दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. सर्वत्र सुरु असलेला पाऊस आणि त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे या पुढील काळात कोविड बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने नागरीकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

