लंपीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतूनाशक फवारणी करा ः देशमुख संगमनेरातील राजहंस दूध संघामध्ये लंपी आजाराबाबत मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मोठे पशुधन असलेल्या या तालुक्यात लंपी आजाराबाबत शेतकर्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हा आजार डास, किडे, गोचिड यांपासून होत असल्याने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठ्याच्या स्वच्छतेसह आजूबाजूला जंतूनाशक फवारणी केल्यास हा प्रादुर्भाव टाळता येतो, असे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध संघात लंपी आजाराबाबत मार्गदर्शन करण्याकरता पशुवैद्यकीय अधिकार्‍यांसह स्वयंरोजगार केंद्राधिकारी व स्थानिक दूध संस्थेच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक आर. बी. रहाणे, लक्ष्मण कुटे, विलास वर्पे, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, बादशहा वाळुंज, गोरक्षनाथ नवले, सोमनाथ जोंधळे, सुभाष गुंजाळ, पंचायत समितीचे डॉ. थिटे, डॉ. शिंदे, डॉ. प्रमोद पावसे, रोजगार केंद्राचे सर्व अधिकारी, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांसह पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना राजहंसचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, पशुधन हे तालुक्याची संपत्ती आहे. मात्र सध्या जनावरांना लंपी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा आजार डास, गोचिड, माशी यापासून होत आहे. तेव्हा जनावरांचे गोठे व आजूबाजूचा परिसर सातत्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे. याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात जंतूनाशक फवारणी करणे गरजेचे आहे. बर्‍याचवेळा शेतकरी बाजारातून गायी व बैल खरेदी-विक्री करतात यातून हा आजार आपल्याकडे येऊ शकतो म्हणून सध्या खरेदी-विक्री टाळा. किंवा इतरांच्या गोठ्यामध्ये आपले जनावर बांधणे, इतरांचे जनावरे आणणे हेही टाळले पाहिजे. या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येत असून लंपी आजाराबाबत घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. स्वच्छता व जंतूनाशक फवारणी हा त्यावर प्रमुख उपाय आहे. काही अडचणी असल्यास नागरिकांनी तातडीने पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी विभाग व राजहंस दूध संघाच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांनी या आजाराची लक्षणे, प्रादुर्भाव, संसर्ग व त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबतची सखोल माहिती सर्व प्रतिनिधींना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *