भंडारदरा ओव्हरफ्लोचे पाणी खरीप पिकांना द्या! श्रीरामपूर तालुका किसान सेलचे आमदारांना निवेदन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
भंडारदरा धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे ओहरफ्लोचे पाणी श्रीरामपूर तालुक्यातील खरीप पिकांसाठी तसेच तळे व बंधारे भरण्यासाठी द्यावे, अशी मागणी श्रीरामपूर तालुका किसान सेलच्यावतीने अध्यक्ष अजिंक्य उंडे यांनी आमदार लहू कानडे यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाने पाठ फिरविल्यामुळे लाभक्षेत्रातील खरीपाची पिके धोक्यात आली असून बळीराजा चिंतेत आहे. खरीपाच्या सर्व पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. अपुर्या पावसामुळे विहिरी, बोअर यांची पाण्याची पातळी खालावलेली आहे. तसेच महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकरी वर्गाला भेडसावत आहे.

आमदार कानडे यांनी शेतकर्यांच्या भावना लक्षात घेवून पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांना सूचना देऊन व लेखी पत्राद्वारे धरणातील ओहरफ्लोचे पाणी चार्यांना सोडण्यात येऊन खरीप पिकांना देण्यात द्यावे, असे सूचविले असल्याचे सांगितले. गावतळी, शेततळी, बंधारे भरल्यास खरीप पिकांना जीवदान मिळून विहिरी, बोअर यांची पाण्याची पातळी वाढेल. यातून शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल, असे आमदार कानडे म्हणाले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अरुण नाईक, अशोक कानडे, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे, हरिभाऊ बनसोडे, रामकृष्ण उंडे, मदन हाडके, अभिजीत लिप्टे, सुरेश पवार, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.
