भंडारदरा धरण भरण्याच्या आशा लांबल्या! पावसाची पूर्णतः उघडीप; आवक होत असलेल्या प्रमाणात विसर्गही सुरु..
नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या जोरदार पावसामूळे धरणातील पाणीसाठे सुस्थितीत पोहोचले असतांना गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली आहे. आज (ता.7) सकाळपासून पाणलोटात सूर्यनारायणाचेही दर्शन झाले असून धरणांमध्ये होत असलेली पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे आज रात्री उशीरापर्यंत भंडारदरा धरण भरण्याच्या निर्माण झालेल्या आशा आता लांबल्या आहेत. सध्या धरणात 1 हजार 273 क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत असून तितक्याच प्रमाणात धरणातून पाणी सोडले जात असल्याने भंडारदरा धरणाची पाणीपातळी 88.58 टक्क्यांवर स्थिरावली आहे. मुळा खोर्यातील पावसानेही आता विश्रांती घेतली असून कोतुळनजीक मुळापात्रातूनही 1 हजार 273 क्युसेक्स पाणी वाहत आहे. आढळा धरणाच्या चिंता मात्र अद्यापही कायम असून धरणाला नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पुनरागमन करणार्या पावसाने अवघ्या पंधरवड्याच्या कालावधीतच खपाटीला गेलेले तिनही धरणांचे जलसाठे समाधानकारक अवस्थेत नेवून पोहोचवल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून पावसाचा जोर ओसण्यास सुरुवात झाली आणि आज (ता.7) पहाटेपासूनच पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. मुळा व प्रवरा नद्यांच्या संपूर्ण खोर्यात सध्या सारखीच स्थितीही अनुभवण्यास मिळत असून आश्चर्यकारक बाब म्हणजे भंडारदरा व मुळा धरणात आज सकाळपासून एकसारख्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे. मुळा नदीच्या पाणलोटातील पावसाचे आगार असलेल्या हरिश्चंद्रगडावरील पाऊसही थांबला असून कृष्णावंतीचा उगम असलेल्या कळसूबाईच्या शिखरांवरही आज सूर्यनारायण प्रकट झाले आहेत.
मागील चोवीस तासांचा विचार करता भंडारदर्याच्या पाणलोटातील पांजरे येथे सर्वाधीक अवघ्या 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटघर व रतनवाडीत प्रत्येकी नऊ मिलीमीटर तर भंडारदर्यात अवघा सात मिलीमीटर पाऊस झाला आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील पाऊसही उघडला असून गेल्या चोवीस तासांत वाकी येथे अवघा सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे वाकीच्या जलाशयावरील पाण्याचा विसर्गही रोडावल्याने निळवंडे धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. सध्या वाकी जलाशयाचा 197 क्युसेक्स आणि भंडारदरा धरणातून सोडले जात असलेले 1 हजार 273 क्युसेक्स पाणी धरणात जमा होत आहे. मुळा खोर्यातील पावसाचे मोजमाप करण्याचे कोणतेही शाश्वत साधन नसून कोतुळनजीक मुळापात्रातून वाहणार्या पाणीपातळीवरुनच त्याचा अंदाज बांधला जातो. गेल्या चोवीस तासांत कातुळ परिसरात थेंबभरही पाऊस नोंदविला गेला नाही.
मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटातील पावसाने विश्रांती घेतली असली तरीही धरणातील एकूण पाणीसाठे समाधानकारक अवस्थेत पोहोचलेले आहेत. मात्र अकोले तालुक्यातील देवठाणनजीक आढळा नदीवर बांधण्यात आलेले 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण मात्र अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. या धरणाचा पाणीसाठा सध्या 49.24 टक्के असून अपवाद वगळता धरणात नवीन पाण्याची आवक सुरु झालेली नाही. 177 चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र लाभलेल्या या धरणावर 3 हजार 914 हेक्टर रब्बी क्षेत्र व 780 हेक्टर खरीपाचे क्षेत्र अवलंबून आहे. 1976 साली लोकार्पण झाल्यापासून 26 वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यंदा मात्र ऑगस्ट महिना उजेडूनही धरणाच्या पाणलोटातील पावसाला जोर चढत नसल्याने लाभक्षेत्रात चिंता निर्माण झाली आहे.
आज सकाळी सहा वाजता जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणाचा एकूण पाणीसाठा 17 हजार 380 दशलक्ष घनफूट (66.84 टक्के), तर जिवंत पाणीसाठा 12 हजार 880 दशलक्ष घनफूट (59.90 टक्के), भंडारदरा धरण (क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट) 9 हजार 779 दशलक्ष घनफूट (88.58 टक्के), निळवंडे धरण (क्षमता 8 हजार 320 दशलक्ष घनफूट) 4 हजार 934 दशलक्ष घनफूट (59.24 टक्के) व आढळा धरण (क्षमता 1 हजार 60 दशलक्ष घनफूट) 522 दशलक्ष घनफूट (49.24 टक्के) पाणीसाठा आहे.