पुणे विभागाच्या राजमार्ग प्राधिकरणाचा पर्यावरण नियमांना ठेंगाच! ‘पुणे-नाशिक’ महामार्गावर सापडली ‘स्वबळावर’ वाढलेली अवघी साडेतीनशे झाडे..
श्याम तिवारी, नायक वृत्तसेवा
नागरिकांच्या करातून गलेलठ्ठ पगार घेवूनही नागरी विचारांऐवजी केवळ ठेकेदाराच्या फायद्याचा विचार करणार्या शासकीय अधिकार्यांची देशात अजिबात कमी नाही. अनेकवेळा तर ठेकेदाराकडून झालेल्या अक्षम्य चुका झाकण्यासाठी कायदे आणि नियमांनाही बगल दिली गेल्याचे असंख्य दाखले वारंवार समोर येत असतांना आता असाच प्रकार संगमनेर तालुक्यातूनही समोर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरणात कत्तल करण्यात आलेल्या 2 हजार 473 झाडांपैकी माळवाडी ते पळसखेडे या अंतरात अवघी 339 झाडे आढळून आली आहेत. यावरुन 2014 सालापासून पुणे विभागीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचेही आता स्पष्ट झाले असून शासकीय सेवेतील अधिकार्यांचे ठेकेदाराच्या बाबतीतले ‘समर्पण’ पाहून तालुक्यातील पर्यावरणप्रेमींचा प्रचंड संताप झाला आहे. सात वर्षांपूर्वीच्या आदेशाला ‘ठेंगा’ दाखवून जिल्हाधिकार्यांसह संगमनेरच्या प्रांताधिकार्यांना खोटी माहिती देणार्या प्रकल्प संचालकांसह संबंधित ठेकेदार कंपनीवर पर्यावरण कायद्यान्वये कठोर कारवाई करावी अशी मागणीही आता पर्यावरण प्रेमींमधून उमटू लागली आहे.
साडेआठ वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरण कामाला सुरुवात झाली. या कामात अडथळा ठरणारी तब्बल 2 हजार 373 झाडे कापण्यात आली. कापलेल्या झाडांच्या बदल्यात संबंधितांनी दहा पट म्हणजे 23 हजार 730 झाडे नव्याने लावून त्यांचे संगोपन करावे असे तत्कालीन प्रांताधिकारी संदीप निचित यांनी राजमार्ग प्राधिकरणासह ठेकेदार कंपनीला कळविले होते. मात्र या सर्व गोष्टींना मोठा कालावधी उलटूनही महामार्गावर झाडेच दिसत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी 14 सप्टेंबर, 2019 रोजी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यावर गेली दोन वर्षे या विषयावर केवळ कागदी घोडे नाचू लागल्याने बोर्हाडे यांनी हरित लवादात धाव घेतली. या दरम्यान संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी 25 फेब्रुवारी, 2021 रोजी भारतीय राजमार्ग विभागाचे प्रकल्प संचालक, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी (भाग 1) व या प्रकरणाचे तक्रारदार गणेश बोर्हाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत 8 जानेवारी, 2014 च्या आदेशाप्रमाणे प्रत्यक्षात वृक्षांची लागवड करण्यात आली किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी उपविभागीय वनअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व संगमनेरचे तहसीलदार सदस्य असलेली संयुक्त समिती स्थापन केली व या समितीकडून याबाबतचा अहवाल मार्च 2021 अखेर मिळेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता.
याच बैठकीत महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अनिल गोरडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 च्या दुतर्फा व मधोमध झाडे लावण्यात आली होती. मात्र त्यातील काही झाडांचे जतन झाले नाही, तसेच नव्याने वृक्ष लागवड करण्यासाठी प्राधिकरणाकडून नव्याने ठेकेदाराची नियुक्ति करुन लागवड पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे फेब्रुवारीत पार पडलेल्या या बैठकीत नव्याने वृक्ष लागवड करण्याचे काम एप्रिल व मे या दोन महिन्यात पूर्ण करावे, ज्या योगे जूनपासून सुरु होणार्या पावसामुळे लागवड झालेली अधिकाधिक झाडे जगू शकतील असेही ठरले होते. प्रत्यक्षात मात्र वृक्षांची नेमकी स्थिती पडताळण्याचे कामच तब्बल तीन महिने विलंबाने 6 जुलै रोजी सुरु करण्यात आले. यावरुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पर्यावरणाबाबत किती गंभीर आहे हे अगदी स्पष्ट झाले. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मार्च अखेरपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार बोर्हाडे यांनी पुन्हा प्रांताधिकार्यांकडे धाव घेतली.
त्यावरुन 10 जून, 2021 रोजी पुन्हा वरील सर्व अधिकार्यांची बैठक घेण्यात आली व 23 हजार 730 झाडांची मोजदाद करण्याकामी माळवाडी, बोटा, कुरकुंडी, शेळकेवाडी, घारगाव व आंबी खालसा या भागासाठी वनविभागाचे वनपाल आर.के.थेटे, महसूल विभागाचे तलाठी हिरवे व मंडलाधिकारी लोहारे. खंदरमाळवाडी, बांबलेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर, गाभणवाढी व चंदनापुरी परिसरासाठी चंदनापुरीचे वनपाल रामदास डोंगरे, मंडलाधिकारी लोहारे. हिवरगाव पावसा, वैदुवाडी, रायतेवाडी, खांडगाव, संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, ढोलेवाडी व गुंजाळवाडी परिसरासाठी कर्ह्याचे वनपाल देवीदास जाधव, तलाठी पोमल तोरणे व मंडलाधिकारी बापूसाहेब ससे आणि घुलेवाडी, वेल्हाळे, सायखिंडी, कर्हे आणि पळसखेड या परिसरासाठी वनपाल जाधव यांच्यासह तलाठी भीमराज काकड व मंडलाधिकारी ससे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आता या सर्वांनी माळवाडी (बोटा) येथून ते पळसखेडेपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांची मोजणी केली असून त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमारे 24 हजार झाडे शोधण्यासाठी माळवाडीपासून निघालेल्या संयुक्त पथकाला संगमनेर खुर्दपर्यंतच्या 35 किलोमीटरच्या अंतरात अवघी 22, तर कासारा दुमालापासून ते पळसखेड्यापर्यंत 317 झाडे सापडली आहेत. यातील बहुतेक सर्वच झाडे ‘स्वबळावरच’ वाढली असून आजच्या स्थितीत ती दुर्लक्षित असल्याचा ठळक शेराही संयुक्त पथकाच्या अहवालात ठळकपणे मारण्यात आला आहे. यावरुन या झाडांचा राजमार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीशी कोणता संबंध आहे का? याबाबत संशय निर्माण झाला आहे.
संगमनेर शहराच्या दक्षिणेकडील माळवाडी, कुरकुंडी, शेळकेवाडी, आंबी खालसा, खंदरमाळवाडी, बांबळेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर, गाभणवाडी, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, वैदूवाडी, रायतेवाडी, खांडगाव व संगमनेर खुर्द या परिसरात एकही झाड आढळून आलेले नाही. या पट्ट्यातील बोटा शिवारात गुलमोहराची 17 तर कांचनाची तीन आणि घारगाव परिसरात गुलमोहराची अवघी दोन अशी एकूण केवळ 22 झाडे आढळून आली आहेत. शहराच्या उत्तरेकडील कासारा दुमालापासून ते पळसखेडे पर्यंतही अशीच स्थिती असून वेल्हाळ्यापासून पुढच्या भागात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या झाडांमूळे राजमार्ग प्राधिकरणाच्या खोटरडेपणाला काहीसा आधार मिळाला आहे. या पट्ट्यात कासारा दुमाला परिसरात लिंबाची पाच, ढोलेवाडी परिसरात लिंबाची दोन व एक पिंपळ, गुंजाळवाडी परिसरात गुलमोहर तीन, लिंब 27 व पिंपळ एक, घुलेवाडी शिवारात गुलमोहर 12, लिंब 17, व सिसमचे एक झाड, वेल्हाळे शिवारात गुलमोहर 16, लिंब 22, पिंपळ बारा व सिसम तीन, सायखिंडी शिवारात गुलमोहर सात, लिंब 13, पिंपळ दोन, कर्हे परिसरात गुलमोहर 74, लिंब 19, पिंपळ 12 व सिसमची 24 तर पळसखेडे परिसरात गुलमोहराची 16, लिंब व पिंपळाची प्रत्येकी दोन व सिसमाची 24 अशी माळवाडी ते पळसखेडेपर्यंतच्या महामार्गावर अवघी 339 झाडे आढळली आहेत. यावरुन राजमार्ग प्राधिकरणाच्या परवानगीने ठेकेदाराने तोडलेली 2 हजार 373 झाडेही लावली गेली नाही हे आता सिद्ध झाले आहे.
महामार्गावरील 23 हजार 730 झाडे लावण्याबाबत जिल्हाधिकारी व संगमनेरचे उपविभागीय अधिकारी यांनी वारंवार पुणे विभागाच्या राजमार्ग प्रकल्प संचालकांशी बैठका घेवून कारवाईच्या सूचना केल्या होत्या. मात्र या बैठकांमध्ये वेळोवेळी प्रकल्प संचालकांनी ठेकेदाराने काही झाडे लावली आहेत, मात्र त्यातील काहींकडे दुर्लक्ष झाले तर काही झाडे शेतकर्यांनी आपल्या फायद्यासाठी तोडल्याचा खळबळजनक खुलासा करुन आपल्या पापाचे खापर शेतकर्यांच्या माथी फोडण्याचा संतापजनक प्रयत्नही केला होता. यावरुन अधिकार्यांचे ठेकेदारांशी असलेले प्रेमपूर्वक समर्पित संबंधही अधोरेखित झाले आहेत.