सावधान! आता संगमनेर तालुका ठरतोय ‘स्वाईन फ्ल्यू’चा हॉटस्पॉट!! आठ दिवसांत दोघांचा मृत्यू; एकावर उपचार सुरू तर तेरा संशयितांवर प्रशासनाची नजर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत मुख्यालयापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण आणि कोविड मृत्यूंची नोंद झालेला संगमनेर तालुका त्यातून सावरत असताना आता तालुक्यात स्वाईन फ्ल्यूने (एच1 एन1) धडकी भरविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण एकट्या संगमनेरात असून त्यातील येठेवाडी येथील 58 वर्षीय इसमासह गुंजाळवाडी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे 15 रुग्ण असून त्यातील 14 एकट्या संगमनेर तालुक्यातील तर अवघा एक रुग्ण कोपरगाव तालुक्यातील आहे. आगामी कालावधीत गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून तालुक्यात ‘टॅमी फ्ल्यू’ गोळ्यांचा साठाही वाढविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली.
2020 साली देशासह जिल्ह्यात पाय पसरणार्या कोविडने संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत अहमदनगर शहरासह संगमनेर तालुक्यात कोविडने अक्षरशः थैमान घातले होते. दोन वर्षांच्या या कालावधीत जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण समोर येण्यासोबतच सर्वाधिक मृत्यू होणार्या तालुक्यांमध्येही संगमनेरचे नाव अग्रणी होते. त्यातून सावरत असताना तालुक्यात आता स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या चिंता वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला असून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व खासगी वैद्यकीय व्यवसायांची बैठक घेवून त्यांना या संक्रमणाने बाधित व्यक्तींच्या चाचण्या व उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
एन्फ्लुएंझा एच1 एन1 प्रतिबंधात्मक उपाययोजना अहवालात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 53 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे तेव्हाही जिल्ह्यात सर्वाधिक पाच मृत्यूची नोंद संगमनेर तालुक्यातून झाली होती. या कालावधीत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 33 हजार 682 जणांची तपासणी करण्यात आली होती. 2020 मध्ये जिल्ह्यातील 1 लाख 8 हजार 808 जणांची तपासणी झाली, त्यातून अवघे दोन रुग्ण सापडले. 2021 मध्ये 76 हजार 85 जणांच्या तपासणीतून चार रुग्ण आढळले तर जानेवारीपासून आत्तापर्यंत एकूण 44 हजार 827 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यात 15 रुग्ण आढळून आले तर दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले दोघेही संगमनेर तालुक्यातील आहेत.
संगमनेर तालुक्यातील निमोण (गाडेकर मळा), निमगाव भोजापूर, निमगाव जाळी, कासारा दुमाला, कोकणगाव, गुंजाळवाडीसह शहरातील देवाचा मळा भागात मिळून स्वाईन फ्ल्यूचे एकूण 13 संशयित रुग्ण आहेत. यापूर्वी पठारावरील खंदरमाळवाडी अंतर्गत येणार्या येठेवाडी येथील 58 वर्षीय इसमाचा 10 ऑगस्ट रोजी तर शहरानजीकच्या गुंजाळवाडीतील 55 वर्षीय इसमाचा 15 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला असून सद्यस्थितीत आश्वी खुर्द येथील रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत संसर्ग वाढणार्या स्वाईन फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत असून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय अधिकारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची एकत्रित बैठक घेवून तपासणी व उपचारांबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गावर प्रभावी ठरणार्या टॅमी फ्ल्यूचाही तालुक्यात मुबलक साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
कोविड आणि स्वाईन फ्ल्यूची लक्षणे एकसारखीच आहेत. स्वाईन फ्ल्यूचा प्रसारही संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला होतो. या रोगाची लागण झाल्यानंतर रुग्णाला ताप येणे, खोकला येणे, घसा खवखवणे व दुखणे, धाप लागणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्यातच सध्या पावसाळा सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे आजार सुरु असून त्यातच आता स्वाईन फ्ल्यूचाही संसर्ग वाढू लागल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी विभागाची धावपळ सुरू झाली आहे. नागरिकांनीही यापासून बचाव करण्यासाठी गर्दीत जाण्याचे टाळून मास्कचा वापर करावा अशा सूचना वैद्यकीय क्षेत्रातून देण्यात आल्या आहेत. यासोबतच वरीलप्रमाणे लक्षणे असल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील येठेवाडी व गुंजाळवाडी येथील रुग्णाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर त्याठिकाणचे सर्वेक्षण करुन उपाययोजना राबविल्या आहेत. कोरोना व स्वाईन फ्ल्यू या दोन्ही आजारांची लक्षणे एकसारखीच आहेत. रुग्णांना अशाप्रकारची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ सरकारी अथवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत. एन्फ्लुएंझा एच1 एन1 (स्वाईन फ्ल्यू) या रोगावर टॅमी फ्ल्यू ही गोळी अतिशय प्रभावी असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुक्यातील या औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
– डॉ. सुरेश घोलप
तालुका वैद्यकीय अधिकारी, संगमनेर