वाळू तस्करांनी वाढवली संगमनेरची पूरनियंत्रण रेषा! 25 ते 30 फूटांची खोली वाढली; 20 हजार क्यूसेकचा प्रवाहही घाटांखालीच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही वर्षात नद्यांच्या पात्रातून सुरु असलेल्या अमर्याद वाळू उपशाचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने समोर येवू लागले आहेत. संगमनेर तालुक्यात तर गेल्या दशकभरात एकट्या प्रवरानदीपात्रातून झालेल्या बेसुमार वाळू उपशामुळे नदीचे नैसर्गिक पात्र तब्बल 25 ते 30 फूटांपेक्षाही अधिक खोल झाले असून बहुतेक ठिकाणी जमिनीखालील खडकही वर आला आहे. त्याचा परिणाम नद्यांची पात्रे खोलवर गेल्याने त्या-त्याठिकाणची पूरनियंत्रण रेषाही वाढली असून जमीनीत होणारा पाण्याचा निचरा थांबल्याने नदीकाठावरील अनेक विहिरींचे नैसर्गिक जलस्रोतही आटले आहेत. अवघ्या दशकभरात झालेला पर्यावरणाचा हा र्‍हास आजही अव्याहत सुरुच असल्याने गेल्या आठवड्यात निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यासह प्रवरा नदीतून तब्बल 20 हजार क्यूसेक वेगाने पाणी वाहूनही संगमनेरच्या घाटांवर त्याची पातळी पोहोचू शकलेली नाही.

नद्या आणि त्यातील वाळू यांचा थेट पर्यावरणाशी संबंध आहे. घाटमाथ्यावर धो धो कोसळणार्‍या पावसाचे पाणी ओढ्या-नाल्यांमधून वाहून नद्यांच्या पात्रात येते आणि रस्त्यात आलेल्या दगड-धोड्यांना घरंगळत नेत ते समुद्राच्या मिलनासाठी धावते. या प्रवासात डोंगरमाथ्यावरुन प्रवाहाने सोबत घेतलेले दगड-धोंडे आपटत-आदळत मार्गस्थ होत असल्याने त्याचे बारीक तुकडे होतात. नद्याच्या वेगवान प्रवाहात ते घासले जावून गुळगुळीत होतात आणि कालांतराने त्याचे रुपांतर वाळूत होते. शेकडो वर्ष चालणार्‍या या प्रक्रियेतून नद्यांच्या पात्रात वाळू निर्माण होते. वाळूने ओतप्रोत भरलेल्या पात्रातून वाहणार्‍या पाण्याचा मोठ्या प्रमाणात जमीनीत झिरपा होतो. त्याचा परिणाम नदीकाठावरील शेतकर्‍यांच्या विहिरी व कूपनलिकांच्या नैसर्गिक जलस्रोतांना जोश चढतो.

अहमदनगर जिल्ह्यात मुळा आणि प्रवरा या दोन्ही नद्यांच्या पाणलोटात दरवर्षी तुफान पाऊस होतो. त्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या मोठ्या धरणांसह जवळपास 50 ते 55 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे छोटे-मोठे जलप्रकल्प भरले जातात. दरवर्षीच्या पावसाळ्यात बहुतेकवेळा प्रवरानदी प्रवाहित असते, तर अनेकदा जास्त पाऊस झाल्याने या दरम्यान प्रवरेला मोठा पूरही येतो. प्रवरा व म्हाळुंगी नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेर शहराला या पूराचा आजवर नेहमीच फटका बसल्याचाही इतिहास आहे, मात्र आता तो इतिहासच राहतो की काय अशी आज प्रवरा नदीपात्राची अवस्था बनली आहे.

संगमनेरच्या प्रवरा नदीची पूरनियंत्रण रेषा तशी निश्चित नाही, मात्र धरणातून 35 हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी नदीपात्रात सोडल्यास ते पूररेषेची मर्यादा म्हणून समजले जाते. इतक्या विसर्गात यापूर्वी चंद्रशेखर चौकातील बालमघाटापर्यंत पाणी येवून नदीकडे जाणारे सर्व मार्ग बंद होत असत. तर साधरणतः 6 ते 8 हजार क्यूसेक विसर्ग सोडल्यास गंगामाईपासून पुणे महामार्गावरील पुलापर्यंतच्या परिसरात असलेले सर्व घाट पाण्याखाली जात असत. यंदा जुलैमध्ये अकोले तालुक्याच्या घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मुळा व प्रवरा या दोन्ही नद्यांच्या उगमांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहीले. सुरुवातीला भंडारदरा धरणाची कवाडे बंद करुन पाणी आडविण्यात आले, मात्र पावसाचा जोर लक्षात घेता धरणांची पाणीपातळी नियंत्रित करण्यास सुरुवात झाल्याने निश्चित मर्यादेपेक्षा अधिकचे पाणी भंडारदर्‍यातून निळवंड्यात व निळवंड्यातून प्रवरा नदीच्या पात्रात सोडले गेले.

यावर्षी निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा आत्तापर्यंतचा उच्चांकी प्रवाह 17 हजार 146 क्यूसेक इतका होता. त्यात धरणाच्या पुढील भागातील ओढे-नाले व आढळा नदीचे पाणी मिसळून संगमनेरपर्यंत येतायेता हा प्रवाह 20 हजार क्यूसेकहून अधिक झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडल्याने खरेतर हे पाणी नदीपात्रातून बाहेर पडून त्याने नदीकाठावरील सगळ्या मंदिरांच्या पायर्‍यांना स्पर्श करणे अपेक्षित होते, मात्र यंदा हे घडलेच नाही. यावर्षी सोडण्यात आलेल्या पाण्याने बहुतेक घाटांच्या केवळ पायर्‍या पाण्याखाली गेल्या. यापूर्वी नदीपात्रातून 20 हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी वाहत असल्यास केशवतीर्थावर होणार्‍या दहाव्या दिवसांचे विधी करण्यासाठी पंपींग स्टेशनच्या मार्गाने यावे लागत.

यावर्षी मात्र असे चित्र दिसलेच नाही. नदीपात्रातून 20 हजारहून अधिक क्यूसेकचा प्रवाह वाहत असतांनाही केशवतीर्थावर जाण्यासाठी गंगामाई आणि साई मंदिरच्या बाजूने असलेले दोन्ही रस्ते खुले होते. नागरिक कोणत्याही अडथळ्यांशिवाय येथपर्यंत वाहनासह येवू शकत होते. यावरुन गेल्या दशकभरात बदललेले चित्र सर्वांनाच अगदी सुस्पष्टपणे जाणवले. दशकभरात झालेल्या बेसुमार वाळु उपशामुळे संगमनेर लगतचे प्रवरानदीचे पात्र जवळपास 25 ते 30 फूट खोली गेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतरही त्याने पात्र मात्र सोडले नाही. त्याचे दुष्परिणाम येणार्‍या कालावधीत नदीकाठावरील शेतकर्‍यांना निश्चित भोगावे लागणार असून या माध्यमातून पर्यावरणाची मोठी हानी झाल्याचेही आता दिसू लागले आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 116432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *