कोपरगावमधील काळे-कोल्हे गटातील वाद शिगेला काळेंच्या ‘ठोकून काढू’ला भाजपचे ‘हलक्यात घेऊ नका’ प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या ‘ठोकून काढू’ला भाजपच्या विवेक कोल्हे यांनी ‘हलक्यात घेऊ नका’, असं प्रत्युत्तर दिलं आहे. कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वादाला नवी फोडणी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांना, ठोकून काढू असा इशारा दिल्यानंतर भाजपचे विवेक कोल्हे यांनी देखील प्रत्युत्तर देत आम्हांला हलक्यात घेऊ नका, असा पलटवार केला आहे.

मंगळवारी शहरातील मध्यवर्ती भागात दहीहंडी उत्सवाची स्वागत कमान लावण्यावरून भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने आले होते. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. मात्र, दहीहंडी उत्सवाच्या दिवशी या घटनेचे पडसाद दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान भाषण करताना आमदार आशुतोष काळे यांनी भाजप गटाला उद्देशून बोलताना, राज्यात सत्ता बदलली तरी कोपरगावचा आमदार मीच असून आमच्या नादी लागाल तर ठोकू काढू असा इशारा दिला.

आमदार काळे यांच्या इशार्‍यानंतर भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी काळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकार गेल्यामुळे आमदार वैफल्यग्रस्त झाले आहेत. अतिशय कमी मतांनी निवडून आल्याचा त्यांना विसर पडला असेल. हाणामारीच्या गप्पा करण्याऐवजी त्यांनी विकासाच्या गप्पा कराव्यात. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आम्ही शांत आहोत मात्र आमच्या अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आमदारांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे. काळे गटाकडून आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ तर कोल्हे गटाकडून भाजप आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. दोन्ही नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळं कोपरगावाचं राजकारण येत्या काही दिवसांत तापणार असल्याचं दिसून येतं.

Visits: 13 Today: 1 Total: 115549

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *